Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच उमेदवार निश्चिती होत नाही. त्यातच आता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नाशिकमध्ये उडी घेतली आहे. नाशिक जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात उमेदवार द्यावा, असा आग्रह स्वाभी कार्यकर्त्यांनी केला आहे.
या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक पदाधिकारी आणि शिष्टमंडळाने माजी खासदार राजू शेट्टी यांची जयसिंगपूर येथे भेट घेतली. यावेळी नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघात संघटनेकडून उमेदवार देण्यात यावा. या मतदारसंघांमध्ये शेतकरी अतिशय त्रस्त आहेत. त्यांच्या अनेक समस्या आहेत. शेतकरी भाजप सरकारवर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे त्याचा फायदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला होईल, असे या पदाधिकाऱ्यांनी श्री शेट्टी यांना सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठे आंदोलन केले आहे. याबाबत सातत्याने आवाज उठवण्यात आले आहे. त्या तुलनेत स्वाभिमानी शेतकरी संघटना येथे कमकुवत दिसून आली. संघटनेतर्फे फारसे मोठे आंदोलन उभे राहू शकलेले नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांमधील नाराजीचा फायदा घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवार दिल्यास त्याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला याचा विचार देखील या निमित्ताने सुरू झाला आहे. खासदार शेट्टी यांनी मात्र उमेदवार देणार की नाही, याबाबत स्पष्ट विधान केलेले नाही. मात्र नाशिक जिल्ह्यात आता स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवार देण्याची तयारी करीत आहे. त्यामुळे राजकारणाने कुस बदलली आहे असे म्हणता येईल.
नाशिक मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यापैकी कोणीही अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाही. मतदारसंघ कोणाला आणि उमेदवार कोण यावरून या दोन्ही आघाड्यांमध्ये एकमत होताना दिसत नाही. या दोन्ही आघाड्यांकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत. मात्र त्यामध्ये शेतकरी हिताची जाण असलेला कोणीही नाही. त्यामुळे या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेदवार दिल्यास नाराज असलेले सर्व गट या उमेदवाराला पाठिंबा देतील. स्वाभिमानीच्या इच्छुकांमध्ये मालती ढोमसे उमेदवार आहेत. त्या माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या निकटवर्ती आहेत. त्याचा फायदा देखील स्वाभिमानी संघटनेला होईल, असा दावा जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे यांनी केला आहे.
जयसिंगपूर येथे शेट्टी (Raju Shetti) यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे राम राजोळे, संजय जाधव, गजानन घोटेकर, आत्माराम पगार, कृष्णा घुमरे या पदाधिकाऱ्यांसह नारायण ढोमसे, रामेश्वर ढोमसे, प्रवीण घुमरे, राहुल ढोमसे, योगेश हांडे आदींसह विविध कार्यकर्त्यांचा समावेश होता.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.