Nashik Loksabha Constituency: नाशिक लोकसभा मतदारसंघात जागा कोणाला आणि उमेदवार कोण यावरून अक्षरशः ओढाताण सुरू आहे. यात आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांनीही उडी घेतली आहे. भुजबळ यांनी यंदा लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी हे कार्यकर्ते मतदारसंघात चाचपणी करीत आहेत.
नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना त्यांच्या विरोधकांकडून कमी आणि स्व पक्षामधूनच अधिक अडचणी येत असल्याचे दिसतआहे. त्यात भारतीय जनता पक्षाने जागा वाटपाबाबत मौन धारण केल्याने हा गोंधळ दिवसागणिक वाढतच आहे. निवडणूक जवळ आली तरीही त्यावर नेमका उपाय आणि निरोप दोन्हीही नसल्याने नाशिक मतदार संघाचे राजकारण गढूळ झाल्याचे चित्र आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नाशिक मतदारसंघासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मुंबई प्रदेश अध्यक्ष समीर भुजबळ यांनी येथून उमेदवारी करावी, यासाठी त्यांचे समर्थक आणि अनुयायी प्रयत्नशील आहेत.
भुजबळ यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन-तीन दिवसात याबाबत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. त्यासाठी थेट मतदार संघातील विधानसभा मतदारसंघनिहाय भुजबळ समर्थक चाचणी करीत आहेत. मतदारसंघाचा कल जाणून घेण्यासाठी अंतर्गत सर्वे करण्याचा देखील त्यांचा प्रयत्न आहे. निवडणूक जवळ येत असताना अचानक भुजबळ यांच्यासारखा हेवीवेट नेता या मतदारसंघात इच्छुक असल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. भुजबळ मनापासून इच्छुक असल्यास वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून जागावाटप आणि उमेदवारी दोन्ही बाबत अपेक्षित बदलते घडवून आणू शकतात. त्यामुळे शिंदे गटात मात्र यावर नाराजीचा सूर उमटू शकतो.
या मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेच्या शिंदे गटाने बंडखोरी करून भाजपला पाठिंबा दिला होता. त्यात जे खासदार भाजपसोबत आले होते, त्यामध्ये हेमंत गोडसे यांचा समावेश आहे. गोडसे यांनी यापूर्वीच प्रचार सुरू केलेला आहे. महायुतीच्या चर्चेत त्यांना उमेदवारीची कमिटमेंट मिळाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. असे असताना महायुतीत रोज नवी राजकीय अस्थिरता निर्माण होत असल्याचे दिसते. त्याचा फटका भाजपच्या सहकारी पक्षांना बसण्याची दाट शक्यता आहे.
नाशिक मतदार संघातून 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे विद्यमान खासदार देविदास पिंगळे यांची उमेदवारी कट करून ऐनवेळी समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यात ते विजयी झाले होते. मात्र 2014च्या निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी केली होती. त्यात खासदार गोडसे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.
2019च्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीकडून पुन्हा समीर भुजबळ यांनी उमेदवारी केली होती. त्यावेळीही त्यांचा चौरंगी लढतीत मोठ्या फरकाने पराभव झाला होता. आता नाशिक मतदारसंघातून भुजबळ कुटुंबीय चौथ्यांदा नशीब आजमावण्याच्या तयारीत दिसून येते. येथे अजित पवार(Ajit Pawar) गटाचे निवृत्ती अरिंगळे यांनी देखील उमेदवारीसाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यांनी प्रचार देखील सुरू केला आहे. अशा स्थितीत भुजबळ यांचे एन्ट्रीने नवा ट्विस्ट निर्माण होऊ घातला आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.