‘रामतीर्थ कॉरिडॉर’साठी हवेत सर्वांगीण प्रयत्न

नाशिकचा विचार करताना समोर आलेला महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे ‘रामतीर्था’चा आहे.
Godavari Nashik
Godavari NashikSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : नाशिक (Nashik) अनेक गोष्टींसाठी देशभर आणि जगभर ओळखलं जातं. शेती, साहित्य, लेणी, चळवळींचे केंद्रस्थान यासाठी देखील नाशिकची ओळख आहे. तथापि, प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं (Lord Shreeram) पावन झालेली भूमी म्हणून नाशिकचं आगळवेगळं असं स्थान अनेकांच्या मनामनांत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची (Kumbhmela) भूमी म्हणून नाशिक सातासमुद्रापार परिचित आहे. नाशिकचा विचार करताना समोर आलेला महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे ‘रामतीर्था’चा आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. (Administration should concentrate on Ramtirth Corridor regarding Nashik)

Godavari Nashik
अबब...विजयकुमार गावितांकडे रस्त्यांसाठी ४ हजार कोटी!

जेव्हा शहरांचे यूएसपी अर्थात, युनिक सेलिंग पॉइंट ठरतात, त्यात धर्मनगरी, अध्यात्मनगरी, पौराणिकनगरी तसेच पुरातत्त्वीय नगरी म्हणूनही ब्रॅन्डिंग महत्त्वाचं असतं. या अंगानंही शहरांचा विकास होत असतो, होऊ शकतो.

Godavari Nashik
Devendra Fadnavis : ठाकरे सरकारच्या काळात गेलेले प्रकल्प आमच्या नावाने दाखवणे बंद करा!

नाशिकच्या सर्वांगीण वाढीसाठी अनेकविध पैलूंच्या माध्यमातून विचार करता येऊ शकतो, मात्र यूएसपी शोधला, तर तो धर्म-संस्कृतीच्या अंगानं जातो. वाराणसीच्या धर्तीवर ‘रामतीर्थ कॉरिडॉर’ विकसित व्हायला हवा. नाशिक शहरात ‘रामतीर्थ कॉरिडॉर’ तर नाशिक-त्र्यंबकेश्वर हा दुसरा स्वतंत्र कॉरिडोर विकसित करण्यासाठी मोठा वाव आणि संधी आहे. सर्व स्तरातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे दोन्ही कॉरिडोर अस्तित्त्वात येऊ शकतात.

‘रामतीर्थ’ ही तशी नाशिकची विशेष अशी ओळख मानली जाते. देशभरातील भाविक रामतीर्थावर येतात. पण हे स्थान रामकुंड संबोधल्याने ते वर्षानुवर्षे संकुचित परिसीमेत अडकून पडले होते. मुळात आजवर या विषयाकडे अभ्यासपूर्वक, विचारपूर्वक पाहिलं गेलं नाही. कुंड अर्थातच मर्यादित स्वरूपात असते. मात्र, हे ‘रामकुंड’ नसून ‘रामतीर्थ’ असल्याचे अनेक संदर्भ देऊन ‘सकाळ’च्या माध्यमातून हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. या ठिकाणी आणखी एका विषयाचा आवर्जून उल्लेख करायला हवा, तो म्हणजे हनुमान जन्मस्थळीचा. हा मुद्दा काही महिन्यांपू्र्वी ‘सकाळ’मधून आम्ही उचलून धरला.

कुणी तरी महात्मा म्हणविणाऱ्या एका व्यक्तीनं हनुमान जन्मस्थळी कर्नाटकात असल्याचं सांगत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जनस्थानातील काही धर्म अभ्यासकांना घेऊन या विषयाचे संदर्भ शोधून ते आम्ही सातत्यपूर्वक मांडले. हे संदर्भ पुराणातले असले तरी त्यात वर्तमानाचा मोठा भाग होता. तो भाग म्हणजे केंद्र सरकारच्या निधीचा. प्रभू श्रीरामचंद्र ज्या मार्गानं वनवासात गेल्याचे पौराणिक संदर्भ, दाखले आहेत, त्या सर्व ठिकाणांच्या विकासासाठी केंद्र सरकारने मोठा निधी देण्याचं ठरवलं आहे.

हा निधीचा आकडा १५०० कोटींच्या घरात आहे. या कारणानं हनुमान जन्मस्थळीचा मुद्दा कर्नाटकातून आलेल्या महाशयांनी मोठा करण्याचा प्रयत्न केला. राम वनगमन मार्गात नाशिकचं अढळ स्थान आहे. वास्तविक नाशिकपासून ते धुळे-नंदुरबार अगदी जळगाव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापर्यंतचा भाग दंडकारण्य म्हणून संबोधला जातो. त्यामुळे या अनुषंगाने येणाऱ्या केंद्र सरकारच्या निधीमुळे इथल्या पायाभूत सुविधांचा विकास होणार असेल, तर ते नाशिककरांसाठी आणि खानदेशवासीयांसाठी व्हायलाच हवं, या भूमिकेतून या विषयाचा पाठपुरावा आम्ही केला.

‘रामतीर्था’च्या संदर्भातदेखील आमची हीच भूमिका आहे. सध्या देशातील मुख्य तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निधी दिला जातोय, ही स्थळे विकसित करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. केदारनाथ, बद्रिनाथ ही त्याची उत्तम उदाहरणं आहेत. वाराणसी अर्थात, काशीचा गंगा कॉरिडॉर अत्यंत उत्तम रीतीनं विकसित करण्यात येतोय. काशीला गेल्या सहा महिन्यांत आठ कोटी लोकांनी भेट दिल्या आहेत, ही त्या विकासाची पावती आहे. काशीमधील पायाभूत सुविधा उभारण्याचं आणि विकसित करण्याचं काम अत्यंत वेगानं सुरू आहे.

अयोध्येच्या संदर्भातही अशाच रीतीनं नियोजनबद्ध विकास सुरू आहे. अलीकडेच उज्जैनच्या महांकालेश्वर कॉरिडोरचा विकास याच पद्धतीनं करण्यात आला. नाशिकमध्ये दोन कॉरिडोर अत्यंत नियोजनबद्धरीत्या आकाराला येऊ शकतात. गोदाघाट परिसरात रामतीर्थ कॉरिडोर. हा कॉरिडोर सुमारे अडीच किलोमीटरचा होऊ शकतो. सध्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इथे काही प्रमाणात काम सुरू आहे. ‘नमामि गोदा’ हादेखील रामतीर्थ कॉरिडॉरचा एक भाग असावा. किंबहुना रामतीर्थ कॉरिडॉर विकासासाठी ‘नमामि गोदा’चा निधी वापरला जावा.

‘नमामि गोदा’साठी १८०० कोटी रुपयांचे नियोजन आहे. दक्षिणवाहिनी असलेल्या गोदावरीचा हा संपूर्ण परिसर ‘रामतीर्थ’ म्हणून जगभरात मान्यता पावू शकतो. तर नाशिक-त्र्यंबकेश्वर हा दुसरा स्वतंत्र कॉरिडॉरदेखील आकारास येऊ शकतो. या दोन्ही कॉरिडॉरसाठी स्वतंत्रपणे अभ्यास करून प्रकल्पांचं नियोजन करावं लागेल. धर्म-संस्कृतीप्रेमी मंडळी, उत्साही नाशिककर, पर्यावरणप्रेमी, पुराण अभ्यासक, नदीप्रेमी आणि ज्यांना ज्यांना गोदावरी बारमाही वाहत राहावी, असं वाटतं, अशा सगळ्यांचा रेटा या कॉरिडॉरसाठी निर्माण व्हायला हवा. गोदावरीत येऊन मिळणारे सांडपाणी, रसायनयुक्त पाणी रोखण्याचं कामदेखील या प्रकल्पाचा भाग आहे. एकूणच सर्वांगीण आणि एकत्रित प्रयत्न झाल्यास नाशिकचा चेहरा आणखी देखणा होईल, यात शंका नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com