जामनेर : लहानपणी आपण चोर- पोलीसचा खेळ खेळायचो. आता मात्र या आघाडी सरकारमध्ये मंत्री- पोलिस- चोर असा खेळ सुरू असल्याची जोरदार टीका माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला. भारतीय जनता पक्षाच्या तालुका बैठकीत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी सांगितले, की महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांविषयी सर्वदूर नाराजी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षात मंत्रालयाचे तोंडही पाहिले नाही. अनिल देशमुख १०० कोटींची वसुली प्रकरणात जेलमध्ये असून, वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. या सरकारला सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांशी काही एक देणे घेणे नसून फक्त ‘वसुली’ हा एकमेव अजेंडा महाविकास आघाडी सरकारचा असल्याचा आरोप यावेळी केला.
नागरिकांमध्ये असंतोष
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्व वर्गात असंतोष आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्राच्या सर्व योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहवायच्या आहे. भाजपचा विचार घरोघरी पोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मनोभावे कामे करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या तालुका बैठकीने आगामी जि. प. व पं. स. निवडणूक व सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग यानिमित्ताने फुकले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महिला जिल्हाध्यक्षा रेखा पाटील, सरचिटणीस सचिन पानपाटील, नवलसिंग पाटील, चंद्रकांत बाविस्कर, गोविंद अग्रवाल, शिवाजी सोनार, छगन झाल्टे, दिलीप खोडपे, तुकाराम निकम, बाबूराव घोंगळे, राजधर पांढरे, जितेंद्र पाटील, महेंद्र बाविस्कर, डॉ. प्रशांत भोंडे, संजय देशमुख, जलाल तडवी, संजू आबा पाटील, नाना सोनार, अतिष झाल्टे, नीलेश चव्हाण, बाळू चव्हाण आदी होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.