Maratha Agitation : मराठा अरक्षणासासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्यात सुरू केलेल्या आमरण उपोषणाचे तीव्र पडसाद राज्यभरात पाहायला मिळाले. बीड-जालन्यात आंदोलनाला तर हिंसक वळण लागले, तर राज्यातील शेकडो गावांत लोकप्रतिनिधींसह विरोधी पक्षाच्या नेत्यांना गावबंदीसारख्या प्रकारांना सामोरे जावे लागल्याने नेते मंडळीत चांगलीच दहशत दिसून आली.
दरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण नवव्या दिवशी स्थगित केले आणि सरकारला दोन महिन्यांच मुदत दिली. जरांगेंनी उपोषण स्थगित केल्याबरोबर राज्यभरातील बहुतांश ठिकाणची उपोषणं आंदोलनही थांबली. मात्र, याला एक ठिकाण अपवाद असल्याचे समोर आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जरांगेंचे उपोषण सुरू असताना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील सर्वच मोठ्या लोकसंख्येच्या गावात साखळी आंदोलन होताना दिसली. यात मराठा समाजाने गावाच्या वेशीवर नेत्यांसाठी गावबंदीचे मोठे फ्लेक्स लावून गावबंदी घोषित केली.
गावात प्रवेशच काय तर गावातून जाणाऱ्या रस्त्यांवर जरी मंत्री-नेत्यांची वाहने दिसली तरी नेत्यांना अडवून जाब विचारण्यात आला. कुठे घोषणाबाजी झाली, तर कुठे काळे झेंडे दाखवले गेले. दौंडमध्ये तर शिवसेना खासदार संजय राऊत यांना लॉजवर काही काळ थांबण्यासही मराठा कार्यकर्त्यांनी विरोध करत हॉटेल बाहेर तीव्र घोषणाबाजी करत आंदोलन केले.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच सत्ताधारी-विरोधी नेत्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचा धसका घेत आपले घोषित दौरे रद्द केले. राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी आपली युवा संघर्ष यात्रा स्थगित केली. आता अखेर जरांगे पाटलांनी सरकारला आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ देत आपले उपोषण आंदोलन स्थगित केले असल्याने सरकारपेक्षा सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. कारण त्यांना आता गावबंदी नसणार आहे.
मात्र, असे असले तरी नगर जिल्ह्यातील जामखेड शहरात सुरू असलेले साखळी उपोषण अद्यापही सुरू असून, तालुक्यातील हे साखळी उपोषण 24 डिसेंबरपर्यंत सुरू असणार आहे. जामखेड तालुक्यात 89 गावे असून, रोज एक गाव साखळी उपोषणात सहभागी होत आहे.
त्यामुळे जरी जरांगे पाटील यांनी आपले उपोषण आंदोलन स्थगित ठेवले असले तरी हा तालुका साखळी उपोषणावर ठाम असून, आंदोलनाची धार कमी होऊ नये आणि सरकारवर आरक्षण घोषित होईपर्यंत दबाव राहावा म्हणून आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
जामखेड शहरात सुरू असलेले साखळी उपोषण 24 डिसेंबरपर्यंत सलगपणे सुरूच राहील. तसेच तोपर्यंत मंत्री,नेते-पुढारी यांना असलेली गावबंदीही कायम असेल, असेही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात मंत्री-नेत्यांना सध्या गावबंदी नसल्याने ते निर्धास्त असले तरी नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात मात्र गावबंदी कायम असल्याने इकडे येताना विचार करूनच यावा लागेल अशी परस्थिती आहे. आज कुसडगाव येथील मराठा बांधवांचे जामखेड तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. उपोषण स्थळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.