नाशिक : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शहर सजत असतानाच राजकीय नाराजीचे पडसादही उमटू लागले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Phadanvis) आणि भाजप (BJP) नेत्यांना संमेलनात सहभागी न केल्याने महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) चांगलेच नाराज झाले आहे. ते चक्क संयोजकांवर रूसले. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरलाय.
साहित्य संमेलन राजकीय नसले, तरी या शहरात राहणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्र्यांसह भाजपच्या एकाही आमदाराचे साधे नाव देखील निमंत्रण पत्रिकेत नाही. शिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनादेखील निमंत्रित न केल्याने महापौर सतीश कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली असून, ग्रंथदींडी वगळता अन्य कार्यक्रमांस आपण हजेरी न लावता समितीच्या भुमिकेचा निषेध नोंदविणार असल्याचे सांगितले.
येत्या ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीत होणाऱ्या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, शहरातील प्रमुख व्यक्तींना निमंत्रण दिले जात आहे. निमंत्रण पत्रिकेत ठराविक पक्षाचीच छाप दिसत असून, भाजपच्या नेत्यांना निमंत्रित न केल्याने सांस्कृतिक व्यासपिठावर राजकीय नाराजीचे फटाके फुटण्यास सुरवात झाली आहे. निमंत्रण पत्रिकेत शहराचे प्रथम नागरिक या नात्याने महापौर सतीश कुलकर्णी यांचे नाव आहे. परंतू, शहरात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार वास्तव्यास आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनादेखील निमंत्रित करण्यात आलेले नाही.
साहित्य संमेलनासाठी नाशिकच्या नावाची घोषणा होताच शहरातील आमदारांनी तातडीने निधी दिला. परंतू, भाजपच्या एकाही आमदाराचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्याची खंत महापौर सतीश कुलकर्णी यांनी माध्यम प्रतिनिधींकडे व्यक्त केली. संमेलन स्वागत समितीचे कार्यवाही जयप्रकाश जातेगांवकर हे निमंत्रण देण्यासाठी महापौरांकडे गेले असता, त्यांच्याकडेही नाराजी व्यक्त करताना संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमाला आपण येणार नसल्याचे महापौर कुलकर्णी यांनी स्पष्टच सांगितले. साहित्य संमेलनासाठी महापालिकेने पंचवीस लाख रुपयांचा निधी दिला आहे. शहरातील नामवंत साहित्यिकांच्या निवासस्थानावर विद्युत रोषणाई करण्याबरोबरच संमेलनस्थळी मोफत शहर बससेवा, स्वच्छता कर्मचारी, अग्निशमन दल आदी प्रकारच्या सेवा पुरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संमेलनात महापालिकेची मुख्य भुमिका असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
---
केंद्रीय राज्यमंत्री शहरात असताना त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नाही. शिवाय, भाजपच्या एकाही आमदाराचे नाव टाकलेले नाही. भाजपच्या वरिष्ठांना टाळल्याने ग्रंथ दिंडी वगळता संमेलनाच्या मुख्य कार्यक्रमाला जाणार नाही.
-सतीश कुलकर्णी, महापौर, नाशिक
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.