MLA Mangesh Chavan
MLA Mangesh ChavanSarkarnama

जयंत पाटलांच्या कारखान्याविरोधात भाजप आमदार मंगेश चव्हाणांचा एल्गार

हजारो ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची व ऊसतोड मुकादमांची डिसेंबर २०२० पासून कोट्यवधी रूपयांची देयके थकली आहेत.
Published on

जळगाव : चाळीसगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील हजारो ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची व ऊसतोड मुकादमांची डिसेंबर २०२० पासून कोट्यवधी रूपयांची देयके थकली आहेत. ही देयके थकविणाऱ्या आमदार जयंत पाटील यांच्या रावळगाव येथील एस. जे. शुगर कंपनीच्या विरोधात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकित रकमेसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जून २०२१ मध्ये ऊस उत्पादक शेतकरी व मुकादमांचा मेळावा घेण्यात आला होता. त्यांनंतर एस. जे. शुगरने नमते घेत बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर १ हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे देयके जमा देखील केली होती. मात्र, उर्वरित देयके एफआरपी प्रमाणे मिळावीत यासाठी गेली ३ महिने आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांनी पाठपुरावा करून देखील एस. जे. शुगर कारखान्याने लवकरच थकीत देयके देण्यात येतील, अशी केवळ आश्वासने दिली जात आहेत.

MLA Mangesh Chavan
भाजपचा ऑनलाईन सभेचा अट्टाहास अन् विरोधकांची कोंडी

अखेर चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी रावळगाव येथील एस. जे. शुगर कंपनी विरोधातील शेतकऱ्यांची थकीत देयके मिळण्यासाठीचे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सएप ग्रुपवर तसेच फेसबुक सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट टाकून आपली भूमिका स्पष्ट केली असून लवकरच सर्वांशी चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशारा त्यांनी दिला तसेच यासाठी येत्या १० दिवसांचा अल्टीमेटम कारखान्याला दिला असून या कालावधीत जर शेतकऱ्यांची, ऊसतोड मुकादमांची थकीत देयके कारखान्याने दिली नाहीत तर कारखान्याला समजेल त्याच भाषेत आंदोलन केले जाईल, असं देखील त्यांनी सांगितले आहे.

आमदार मंगेश चव्हाण यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे, की रावळगाव येथील एस. जे. शुगर कारखान्याच्या उर्वरित थकीत देयकांच्या बाबतीत गेल्या महिनाभरापासून सातत्याने गृपवर, फोनवर व प्रत्यक्ष भेटून शेतकरी बांधव विचारणा करत आहेत. आपण सर्व दि.१२ जून २०२१ रोजी एकत्र येत थकीत देयके न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यांनंतर कारखान्याने काही रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली, सोबतच कारखान्यावर शासनाने जप्ती आणून लिलाव प्रक्रिया देखील केली. त्यानंतर मीदेखील सातत्याने कारखान्याच्या संपर्कात होतो.

MLA Mangesh Chavan
भाजपची डोकेदुखी वाढली; आणखी दहा आमदार फुटणार?

शेतकऱ्यांच्या उर्वरित देयकांबाबत कारखान्याचे मालक, शेकाप नेते आमदार जयंतभाई पाटील, कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालिका मीरा घाडीगावकर यांच्याशी दोन ते तीन वेळा बोलणे झाले असता त्यांनी लवकरात लवकर उर्वरित थकीत देयके देण्याचे आश्वस्त केले. म्हणून काही काळ आपण शांत राहण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरीच्या काळात ढगफुटीसदृश्य पावसाने तालुक्याला झोडपून काढले त्यात शेतकऱ्यांसह तालुक्यात मोठी हानी झाली. त्यातून जनतेला सावरण्यासाठी मी गेली १५ दिवस स्वतः गावोगावी जाऊन भेटी दिल्या. मात्र आता रावळगाव येथील एस. जे. शुगर कारखाना थकीत शेतकऱ्यांच्या, मुकादमांचाच नव्हे तर माझा देखील संयम ढासळू लागला आहे, असे चव्हाण यांनी नमूद केलं आहे.

पाहिली तितकी वाट आता खूप झाली. रावळगाव कारखान्याला शेवटचा अल्टीमेटम देऊया. जर येत्या १० दिवसांच्या आत कारखान्याने शेतकऱ्यांचे थकीत देयके अदा केली नाहीत तर सर्व शेतकरी बांधवांच्या साथीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. शेतकऱ्यांच्या कष्टाचे पैसे वर्षभर थकविणाऱ्यांना आता ज्या भाषेत समजेल त्याच भाषेत सांगावे लागणार आहे. आंदोलन कसे करायचे, कुठे करायचे आणि केव्हा करायचे याबाबत येत्या चार ते पाच दिवसात सर्वांशी चर्चा करून दिशा ठरवली जाईल व तसे निरोप शेतकऱ्यांना देण्यात येतील. चला तर, पुन्हा एकदा आपली एकजूट दाखवण्याची वेळ आता आली आहे, असं आवाहन चव्हाण यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com