Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जामुळे सगळ्याच पक्षातील उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांत एकूण ७१ उमेदवारांनी ११९ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
शेवटच्या दिवशी काल (मंगळवारी) ४० पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात २४ अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. शहादा मतदारसंघात विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्यासह काँग्रेसचे राजेंद्रकुमार गावीत तसेच वंचित बहुजन आघाडी व सात अपक्षांचा समावेश आहे. सर्वाधिक अर्ज नवापूर मतदारसंघात २२ उमेदवारांनी ३८ तर सर्वात कमी शहादा मतदारसंघात १४ उमेदवारांनी २१ अर्ज दाखल केले आहे.
शेवटच्या दिवशी मंगळवारी शहादा मतदारसंघात काँग्रेसचे राजेंद्रकुमार गावीत, अक्कलकुव्यात भारत आदिवासी पार्टीचे अॅड. पद्माकर वळवी, अपक्ष म्हणून रतन पाडवी यांनी तर नंदुरबारमधून डॉ. विजयकुमार गावीत यांनीही मंगळवारी अपक्ष म्हणून अर्ज भरला.
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात एकूण १८ उमेदवारांनी ३३ अर्ज भरले आहेत. विद्यमान आमदार के. सी. पाडवी यांच्यासह सहा अपक्षांचा समावेश आहे. माजी मंत्री पद्माकर वळवी यांनीही भारतीय आदिवासी पार्टीतर्फे अर्ज भरला आहे.
धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत आतापर्यंत ११५ जणांनी १६५ उमेदवारी अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी ७२ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
मंगळवारी दिवशी भाजपकडून राम भदाणे, अपक्ष हिलाल माळी, अश्विनी कुणाल पाटील यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे. शिरपूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कम्युनिस्ट पक्षाचे बुधा पावरा यांनी उमेदवारी दाखल केली. विविध पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष अशा सुमारे ६३ उमेदवारांनी देखील आपले नशीब अजमाविण्याचा प्रयत्न केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.