

Nashik Crime updates नाशिकमधील भोंदू अशोक खरात व TCS कंपनीतील महिला लैगिंक शोषण व धर्मांतर प्रकरण देशभरात गाजत आहे. या दोन्ही प्रकरणातील दोन महिला संशयित गुन्हेगारांनी पोलिसांना मोठं आव्हान दिलं असून गेल्या महिनाभरापासून फरार असलेल्या या दोन्ही महिलांना पोलीस पकडू शकलेले नाही.
यामध्ये पहिली महिला भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात आहे. कल्पना खरातवर ३१ मार्च रोजी शिर्डी पोलिसांत अवैध सावकारी व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून ती फरार आहे. महिना उलटला तरी देखील पोलिसांच्या हाती ती लागलेली नाही. कल्पनाला पकडण्यासाठी तपास यंत्रणांची तीन पथके तिच्या मागावर आहे. तिला शोधण्यासाठी पोलिसांचे सर्वोतपरी प्रयत्न सुरु असून शिर्डी पोलिसांचे विशेष पथक व अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयाचे पथकही तिच्या मागावर आहे. एसआयटीच्या टीमकडूनही तिचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी कल्पना खरातच्या नाशिक येथील घरी झाडाझडती घेतली. नातेवाईकांकडे तीची चौकशी करुन झाली. पोलिसांकडून लूकआउट नोटीसही जारी करण्यात आलेली आहे. मात्र, महिना उलटूनही पोलिसांना तिला शोधण्यात यश आलेलं नाही.
तर दुसरी महिला, नाशिकमधील TCS कंपनीतील पीडित महिलेवर अत्याचार व धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित निदा खान अद्यापही नाशिक पोलिसांच्या एसआयटी पथकाच्या हाती लागलेली नाही. गेल्या दीड महिन्यापासून निदा खान पसार असून, आता तर तिचा अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे लवकरात लवकर पोलिसांकडून तिचा शोध लागने अपेक्षित आहे.
देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात निदा खान व संशयितांविरोधात दाखल गुन्ह्यात एसआयटीने दोघांना अटक केली आहे. तिसरी संशयित निदा खान २५ मार्चपासून पसार आहे. ती टीसीएस कंपनीत प्रोसेस असोसिएट म्हणू काम करत होती. निदा खानने पीडितेच्या धर्मांबद्दल शेरेबाजी करीत, धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे.
निदा खानला अटक करण्यासाठी एसआयटीच्या पथकाने मुंब्रा येथे धाड टाकली होती. परंतु ती तिथून आधीच निसटली होती. निदाने नाशिक रोड सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. वकिलामार्फत तिने आपण गरोदर असल्याचा दावा करत अटकपूर्व जामीनासाठी विनंती केली होती. त्यावर सरकार पक्षाने तिला जामीन देण्यास विरोध दर्शवला. निदाला अटक करून चौकशी केल्याशिवाय तपासाला गती येणार नसल्याचे व गुन्ह्यात तिच्या समावेशाचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले. त्यामुळे न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. तिला कोणतेही संरक्षण दिलेले नाही.
असे असताना, एसआयटीला दीड महिन्यापासून निदा खान सापडू शकलेली नाही. त्यामुळे निदा खान व कल्पना खरात या दोन्ही संशयित आरोपींना शोधण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसह तपास पथकांपुढे कायम आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.