

Nashik News : नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा होणार असून त्या दृष्टीने प्रशासनाकडून जोरदार तयार करण्यात येत आहे. मंत्री गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री म्हणून काम बघत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात १३ मार्च रोजी कुंभमेळा शिखर समितीची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील साधू-महंतांना निमंत्रित न केल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कुंभमेळा हा साधू- महंतांसाठी भरविला जात असतो. पंरतु येथे त्यांनाच दूर ठेवले जात असेल, तर त्यांच्याविनाच कुंभमेळा भरवा, अशा शब्दात महंतांनी नाराजी बोलून दाखविली आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष तथा पंचायती आनंद आखाड्याचे प्रमुख महंत शंकरानंद सरस्वती हे यावरुन चांगलेच भडकले आहेत. साधू-महंताना विश्वासात घेतले जात नसेल तर शासनाने साधूंशिवाय कुंभमेळा करुन दाखवावा असे आव्हान शंकरानंद सरस्वती यांनी दिले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू-महंतांची प्रमुख भूमिका असते. मात्र, शिखर समितीच्या बैठकीसाठी त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील एकाही आखाड्याला निमंत्रण दिले नाही. याविषयी महंत शंकरानंद सरस्वती यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, की सिंहस्थ कुंभमेळ्यात साधूंनाच दूर ठेवले जाणार असेल, तर शासनाकडून आम्ही काहीच अपेक्षा ठेवणार नाही. सरकार साधू महंताविषयी उदासीन असेल तर आमचा कुंभमेळा आम्ही करु त्यासाठी शासनाच्या मदतीची गरज नसल्याचा इशारा शंकरानंद सरस्वती यांनी दिला.
उज्जैन, प्रयागराज येथील सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू-महंतांना सर्वाधिक मानसन्मान दिला जातो. पण नाशिक व त्र्यंबकेश्वरबाबत असा दुजाभाव का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. साधू-महंतांना बैठकीसाठी बोलवण्याचा सन्मान दिला जात नाही. सरकार जर पुरोहित संघाच्या माध्यमातून कुंभमेळा यशस्वी करू बघत असेल, तर त्यांनी साधू-महंतांना निमंत्रण देऊ नये. आम्ही सिंहस्थ कुंभमेळ्यापासून दूर राहतो. सरकार व पुरोहित संघाने कुंभमेळा घ्यावा, अशी आखाडा परिषदेची संयुक्त भूमिका आहे. आम्ही आमच्या पद्धतीने कुंभमेळा साजरा करू अशी कठोर भूमिका महंत शंकरानंद सरस्वती यांनी मांडली.
नाशिक महापालिका व पुरोहित संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सिंहस्थ ध्वजारोहणाचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यासंदर्भात बोलताना.. कुंभमेळा हा साधू -महंतांचा आहे. त्यामुळे शासनाला निमंत्रण देताना साधू-महंत व पुरोहित संघ मिळून निमंत्रण देण्याची परंपरा आहे. परंतु साधूंच्या परोक्ष नाशिक पुरोहित संघातर्फे मुख्यमंत्र्यांना निमत्रंण देणे गैरे असल्याचे मत महंत शंकरानंद सरस्वती यांनी व्यक्त केलं. असेच असेल तर कुंभमेळा प्राधिकरण व पुरोहित संघाने साधुविरहित कुंभमेळा भरवावा असे महंत शंकरानंद सरस्वती यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.