Nashik Water Politics : 'या' नेत्यांवर वरुणराजानं केलीये कृपा, मतदारसंघात पोहोचलंय पाणी

Dr Rahul Aher : भाजपचे आमदार डॉ राहुल आहेर पाठपुरावा करीत होते. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याला हे पाणी मिळावे, म्हणून नियोजनपूर्वक काम केले. एकाच दिवसात चांदवड आणि येवला दुष्काळी तालुक्यात पोहोचले पूराचे पाणी.
Dr. Rahul Aher
Dr. Rahul AherSarkarnama
Published on
Updated on

Dr Rahul Aher News : पाणी हा नेत्यांसाठी कधी दिलासा देणारा तर कधी अडचणीत आणणारा विषय असतो. सध्या नाशिकमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्या पावसाने अडचणीत असलेल्या आमदारांना दिलासा दिला आहे. मांजरपाडा दिवसाने प्रकल्पाचे पाणी दरसवाडी-पुणेगाव पोहोच कालव्याच्या माध्यमातून चांदवडला मिळावे, यासाठी भाजपचे आमदार डॉ राहुल आहेर पाठपुरावा करीत होते. पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी येवल्याला हे पाणी मिळावे, म्हणून नियोजनपूर्वक काम केले.

प्रशासकीय मंजुरी, शासनाचे पाठबळ, निधी मिळाला. राज्यात महायुतीचे सरकार असल्याने या दोन्ही आमदारांना त्या दृष्टीने अनुकूलता होती. या प्रयत्नामुळेच पाणी पोहोचण्याची व्यवस्था होऊ शकली. याची जाणीव दोन्ही मतदारसंघातील जनतेबरोबरच जिल्ह्यालाही आहे. यंदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रयत्न अधिक जोमाने सुरू होते. त्याला गेल्या दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसाने साथ दिली. दोन्ही आमदारांच्या राजकीय कारकि‍र्दीला पावसाने मदत केली आहे, असे म्हणता येईल.

महायुतीच्या (Mahayuti) या दोन्ही आमदारांवर निसर्ग प्रसन्न झाला. चांदवड मार्गे येवला असा कालव्याचा मार्ग आहे. त्यामुळे आधी चांदवडला आणि त्यानंतर काही तासांतच येवल्याला पाणी पोहोचले. अवघ्या पंधरा तासात मांजरपाडा धरणातून हे पाणी दोन्ही मतदारसंघात पोहोचले. यापूर्वी त्यासाठी प्रयत्न झाले. महिनाभर प्रयत्न करूनही पाणी टेल पर्यंत पोहोचत नव्हते. यंदा ही स्थिती बदलली. त्यामूळे दोन्ही आमदारांच्या समर्थकांमध्ये जल्लोष झाला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाण्यावरून राजकारण झाले नाही, तरच नवल.

या पाण्याला आमदारांच्या विरोधकांनी दिवाळीत मांडे खाण्याचा प्रकार, असे संबोधले आहे. दिवाळीत प्रत्येकालाच मांडे मिळतात. तसे पावसाळ्यात प्रत्येकालाच पाणी मिळते. जेव्हा गरज असेल, टंचाई असेल, तेव्हा पाणी मिळेल का? हा खरा प्रश्न आहे. अशी टीका विरोधकांनी केली आहे. लोकांच्या टीकेला न जुमानता येवल्यात मंत्री भुजबळ यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. जलपूजनाचा सोहळा केला. दिलीप खैरे यांनी पेढे वाटले. यावेळी अंबादास बनकर (Ambadas Bankar) आणि खैरे यांच्या उपस्थितीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गुलाल उधळण्यात आला. त्यामुळे मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी येवल्यात पोहोचल्याने मंत्री भुजबळ यांचा एक महत्वाकांक्षी उपक्रम यशस्वी झाला, असा दावा करण्यात येत आहे.

Dr. Rahul Aher
Video Vivek Kolhe : पवारसाहेबांसोबतचा प्रवास यादगार..; विवेक कोल्हेंच्या प्रतिक्रियेने भाजपचं टेन्शन वाढलं

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, ज्ञानेश्वर शेवाळे, मोहन शेलार, दत्ता निकम, अल्केश कासलीवाल, एल. जी. कदम, बाळासाहेब गुंड यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी त्यात भाग घेतला. चांदवड येथे आमदार डॉ आहेर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी दुष्काळी चांदवडला पाणी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यात सहभागी झाले.

पाणी आले म्हणजे राजकारणही आलेच. यावेळी शेतकर्‍यांनी कालव्याला आलेल्या पूर पाण्याने परिसरातील शेत तलाव, विहिरी आणि अन्य पाण्याचे स्त्रोत भरून घ्यावेत. त्यासाठी आमदारांनी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली. चांदवड आणि येवला या दोन्ही मतदारसंघांना जलसंजीवनी देण्याच्या दृष्टीने मंत्री भुजबळ आणि आमदार आहेर यांनी प्रयत्न केले. ते यशस्वी झाले. मात्र पाऊस पडला, धरण भरले आणि पंधरा तासांत दोन्ही मतदारसंघात पाणी पोहोचले. तीन पिढ्यांची स्वप्नपूर्ती होत असल्याचा आनंद यावेळी व्यक्त करण्यात आला.

Dr. Rahul Aher
Rajabhau Vaje Politics: विमानसेवेचा प्रश्न; खासदार वाजे यांनी नाशिककरांवर टाकली `ही` जबाबदारी?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार त्याचा लाभ घेणारच. विरोधकांनीही आता त्यावर काय भूमिका घ्यावी याचे मंथन सुरू केले आहे. एकंदरच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाऊस मंत्री भुजबळ आणि डॉक्टर आहेर यांच्यावर विशेष मेहरबाण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com