NCP Sharad Pawar Politics: भाजपच्या वाटेवरील उदय सांगळे म्हणतात, सिन्नरला सर्व गटांत उमेदवार देणार!
NCP Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दुसरा धक्का बसला आहे. विधानसभेसाठी आयात केलेल्या दुसऱ्या उमेदवारांचीही घरवापसी होत आहे. या निमित्ताने सिन्नरचे राजकारण घुसळून निघणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय व्युहरचना आणि रसद पुरवठा याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सिन्नर आणि पूर्व मतदारसंघांसाठी उमेदवार आयात केले होते. यातील भाजपचे गणेश गीते यापूर्वीच स्वगृही परतले आहेत. दुसरे उदय सांगळे भाजपच्या वाटेवर आहे.
उदय सांगळे यांनी यापूर्वीच भाजपशी सलगी केली होती. सांगळे यांचे समर्थक सामाजिकदृष्ट्या भाजपशी वैचारिक जवळीक ठेवून आहेत. त्यामुळे श्री. सांगळे यांना स्थानिक राजकारणात भाजप वगळता अन्य राजकीय पर्याय उपलब्ध नव्हते.
पुढील आठवड्यात श्री. सांगळे भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत. त्या माध्यमातून क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे राजकीय स्पर्धक अशी त्यांची प्रतिमा निर्माण होईल. श्री सांगळे यांनी विधानसभा निवडणुकीत क्रीडा मंत्री कोकाटे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती.
सिन्नर तालुक्याच्या राजकारणात क्रीडामंत्री कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे हे प्रमुख गट आहेत. यामध्ये तिसऱ्या नेत्याला संधी नव्हती. उदय सांगळे यांनी भाजप प्रवेश केल्याने महायुतीत फूट पडेल मात्र तिसऱ्या आघाडीचा ‘उदय’ होणार आहे.
सिन्नर नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्व निवडणुका लढवणार आहोत. सर्व सहा गटांमध्ये आणि बारा गणांमध्ये उमेदवार देण्याची तयारी केली आहे. याकडे प्रत्येक जागेवर दोन ते तीन प्रबळ उमेदवार असल्याचा दावा उदय सांगळे यांनी केला.
उदय सांगळे हे शिवसेना ठाकरे पक्षात कार्यरत होते. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्याशी त्यांची जवळीक वाढली होती. त्यामुळे खासदार वाजे यांच्या समर्थकांनी त्यांना जाणीवपूर्वक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दूर ठेवले होते.
सिन्नरचा इतिहास विचारात घेता या मतदारसंघात मराठा विरुद्ध वंजारी असा राजकीय संघर्ष होत आला आहे. दोन मराठा उमेदवार असल्यास वंजारी समाजाला संधी मिळत आली आहे. यातून माजी राज्यमंत्री (कै) तुकाराम दिघोळे यांचे नेतृत्व या तालुक्याला लाभले होते. आता पुन्हा ते राजकारण परतणार का? याची चर्चा होत आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.