

Ahilyanagar crime news : राज्याचं मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याच्या गृहखात्याचा कारभार आहे. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्याचं आव्हान आहे. यासाठी वेगवेगळ्या पातळीवर सरकारकडून उपाययोजना सुरू असतानाच, अहिल्यानगरच्या राहुरी इथं वेगळाच प्रकार घडला आहे.
सुमारे 15 जणांनी पोलिस कर्मचाऱ्यावर थेट हल्ला चढवला. अंगावर कपडे फाडेपर्यंत या जमावाने मारहाण केली. मार खाणारा पोलिस कर्मचारी मोठ-मोठ्याने आरडाओरडा करत असताना एकाने थेट दगड घेऊन त्याच्या दिशेने भिरकवला. पोलिस कर्मचाऱ्यांवरील या हल्ल्याच्या मागे, स्थानिक राजकीय पदाधिकारी व त्यांचे गुंड होते, असे सांगितलं जात आहे. या प्रकारामुळे अहिल्यानगर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी, राहुरी तालुक्यातील मनमाड महामार्गावर डिग्रस फाटा इथं मद्य प्राशन केलेले काही जण चारचाकी वाहनाला कट मारल्यावरून ट्रक चालकाला लाकडी दांडक्याने आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करत होते. त्यावेळी राहुरी पोलिस (Police) ठाण्यातील पोलिस हवालदार विकास वैराळ हे तिथं वाहनातून पोहोचलं.
अहिल्यानगरकडून राहुरीकडे येत असताना त्यांनी गर्दी पाहून वाहन थांबवले. यावेळी त्यांनी जमावाला ट्रक चालकाला मारहाण (Crime) करण्यास मज्जाव केला. परंतु हा जमावाने त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरवात केली. शिवीगाळ करून दमदाटी केली. जास्त वाद नको म्हणून मिटवा-मिटवी झाली.
पण पोलिस कर्मचारी विकास वैराळ हे रात्री साडेअकरा वाजता राहुरी शहरातील एका चौकात बंदोबस्तावर असताना, तोच जमाव तिथं त्यांच्यासमोर आला. त्यांनी हवालदार विकास वैराळ यांना पुन्हा विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरवात केली. फायटर, लोखंडी गज, लाकडी दांडके आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरवात केली.
विकास वैराळ यांना अंगावरील कपडे फाडेपर्यंत जमावाने मारहाण केली. जमावातील काहींनी तोंडावर बुक्या मारल्या. काहींनी त्यांना पळवले. जमाव आक्रमक झाल्याने वैराळ जीव वाचवण्यासाठी ओरड होते. त्याचवेळी जमावातील एकाने मोठा दगड उचलून थेट त्यांच्यावर फिरकवला.
हा सर्व प्रकार काहींनी मोबाईलमधील कॅमेऱ्यांमध्ये कैद केला आहे. आता या जमावाच्या हल्ल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. जमावाच्या हल्ल्यात हवालदार विकास वैराळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिस कर्मचारी विकास वैराळ यांच्या फिर्यादीवरून, राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी खंडू वसंत काळे, वैभव बाबासाहेब तारडे, संतोष अंकुश काळे (सर्व रा. बुरुडगाव, अहिल्यानगर), महेश निमसे याच्यासह अनोळखी 11, अशा एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी पोलिसांनी आरोपी खंडू काळे, वैभव तारडे, संतोष काळे या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील चारचाकी वाहन जप्त केले आहे. उपनिरीक्षक समाधान फडोळ तपास करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.