

Rahata Municipal Election : मतदानाच्या आदल्या दिवशी ऐनवेळी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने कारण देत, निवडणूक अधिकाऱ्यांनी पाच मशीन बदलले. निवडणूक अधिकाऱ्यांनी बिघाड झालेल्या मशीन न दाखवल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. या गदारोळात राहाता नगरपालिका निवडणुकीत 77.87 टक्के मतदान झालं.
यानंतर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात परिवर्तनाच्या गप्पा रंगू लागल्या होत्या. परंतु मतमोजणीच्या दिवशी चित्र वेगळंच दिसलं. मंत्री विखे पाटलांनी राहाता नगरपालिकेवर एकहाती वर्चस्व सिद्ध केलं. राहाता नगरपालिकेत 21 पैकी नगरसेवकपदाच्या 20 जागा जिंकल्या. तर नगराध्यक्षपदावर डाॅ. स्वाधीन गाडेकर यांच्या रूपाने विजयाचा गुलाल उधळला.
राहाता नगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने (Mahayuti) नगराध्यक्ष पदासह 21 पैकी तब्बल 20 जागा जिंकत विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी 4519 मताधिक्याने विजय मिळवला. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजयी उमेदवाराचे कौतुक केलं आहे. या विजयानंतर राहाता शहरातून महायुतीच्या विजयाची गुलाल उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली.
विरोधकांसाठी हा निकाल मोठा धक्का आहे. राहाता नगरपालिका शहर विकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. या आघाडीचे नगरसेवक उमेदवार शशिकांत लोळगे हे एकमेव उमेदवार विजय मिळवू शकले. मंत्री विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या नेतृत्वाखालील या एकतर्फी विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. मतमोजणीनंतर जसे निकाल येत होते, तसा नगरपालिकेच्या प्रांगणात मोठ्या संख्येने उपस्थित असलेले महायुतीचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. फटाक्यांची आतषबाजी करीत गुलाल उधळत करत होते.
नगराध्यक्षपदाचे भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. स्वाधीन गाडेकर 9459 मते घेत विजयी झाले. प्रतिस्पर्धी लोकक्रांती सेनेचे उमेदवार धनंजय गाडेकर 4940 पराभूत झाले. याशिवाय नगराध्यक्षपदाचे भानुदास गाडेकर 192, बाळासाहेब गिधाड 173, अनिल पावटे 50, तुषार सदाफळ 176, रामनाथ सदाफळ 106, नोटासाठी 61 मतदान झालं.
पूजा गिधाड, प्रवीण सदाफळ, रवीना माळी, अरुण आग्रे, पुष्पा आरणे, राहुल सदाफळ, अर्चना निकाळे, विजय सदाफळ, दशरथ तुपे, सविता सदाफळ, संदीप मुर्तडक, मंगल डांगे, अंजली सदाफळ, रफिक (मुन्नाभाई) शहा, ऋषिकेश पाळंदे, अनिता शेळके, शीतल बनकर, नीता गाडेकर, नितीन गाडेकर या महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला. विरोधक लोकक्रांती सेनेचे शशिकांत लोळगे या एकमेव उमेदवाराचा विजय झाला.
'हा विजय भाजपचा असून मी हा विजय राहाता येथील जनतेला समर्पित करतो, राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांनी नेहमी भक्कम साथ दिल्याने, आम्हाला विकास कामाला गती देता आली. सुजय विखे यांनी शिर्डी व राहाता नगरपरिषदेत सुरुवातीपासून लक्ष देत सर्व उमेदवार निवडून आणले, त्यांचे सुद्धा मी कौतुक करतो,' अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.