

Ahilyanagar Congress self-reliance slogan : महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. परंतु पक्षश्रेष्ठींना अजून त्यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. काही जिल्ह्यांमध्ये भाजपच्या स्थानिक नेते, मंत्र्यांनी स्वबळासाठी पक्ष नेतृत्वाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याचे सांगत आहे.
भाजपबरोबरच आता काँग्रेसचे पदाधिकारी स्वबळाचा नारा देऊ लागले आहेत. अहिल्यानगरमधील काँग्रेस आमदार, पदाधिकाऱ्यांनी 'स्थानिक'साठी स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील जवळपास पदाधिकाऱ्यांच्या सुरात-सूर मिसळला आहे.
संगमनेरच्या (Sangamner) अमृतनगर इथं अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक झाली. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आमदार हेमंत ओगले, कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, प्रतापराव शेळके, मधुकरराव नवले आदी उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्हा हा काँग्रेस (Congress) विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. सतत भूलथापा देऊन आणि जातीयवाद करून सत्तेवर आलेल्या महायुतीच्या पक्षांचे खरे रूप जनतेला कळाले आहे. यामुळे सर्वसामान्य जनता, नागरिक, युवक आणि महिला यांच्यामध्ये सत्ताधाऱ्याविरुद्ध मोठा संताप निर्माण झाला असून काँग्रेसला अनुकूल वातावरण आहे. आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात, अशी एकमुखी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.
आमदार हेमंत ओगले यांनी, काँग्रेस पक्षाला मोठी विचारधारा आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर जिल्ह्यातील नागरिकांचा मोठा विश्वास आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठी संधी आहे. काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यामुळे या सर्व निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात, अशी जिल्ह्यातील तमाम काँग्रेसजनाची प्रमुख मागणी असून आमचे नेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही मांडलेले असून त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल, सांगितले.
कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी, महायुतीच्या भूलथापांना लोक कंटाळले आहे. खरे तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव निश्चित होता. स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्यांसाठी मोठी संधी असून काँग्रेस पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढू, असे सांगितले. करण ससाणे यांनी देखील देशाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आता संपूर्ण देशातील वातावरण बदलले आहे. बिहारमध्ये सुद्धा काँग्रेसचे सरकार येणार असून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष एक नंबरचा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
मधुकरराव नवले, शहाजी भोसले, अरुण म्हस्के आणि सचिन चौगुले यांनी महायुतीमध्ये चलबिचल आहे. ज्यांनी आयुष्यभर भाजपचे काम केले, त्या खऱ्या कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करण्यात आले आहे. बाहेरून आलेल्यांना संधी दिली जात आहे. महायुतीमध्ये आता सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, असा टोला लगावला. यावेळी सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदा स्वबळावर लढवण्याची मागणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.