

Nashik News : नाशिक शहरात पुढील वर्षी कुंभमेळा होणार असून त्यापार्श्वभूमीवर प्रस्तावित 66 किलोमीटरच्या रिंग रोडसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेने आता राजकीय वळण घेतलं आहे. नाशिक जिल्ह्यातील मातोरी व मुंगसरे गावात मोजणीदरम्यान शेतकरी महिलांना पोलिस व अधिकाऱ्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप असून त्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
संजय राऊत हे खूप दिवसांनी गुरुवार (दि. ७) नाशिक दौऱ्यावर आले. त्यांनी यावेळी पत्रकारांशी विविध मुद्द्यावर संवादही साधला. याच दरम्यान, रिंग रोडला विरोध करणाऱ्या बाधित शेतकरी महिलांनी त्यांची भेट घेऊन मोजणीदरम्यान घरात घुसून आपल्याला मारहाण करण्यात आल्याचं सांगितलं. यावेळी राऊत यांनी थेट इगतपुरी -त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी पवन दत्ता यांना फोन लावून यासंदर्भात जाब विचारला. तसेच पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्याकडेही तक्रार नोंदवली.
राऊत यांनी प्रांताधिकारी पवन दत्ता यांना थेट फोन लावला. "तुम्हाला कोणी अधिकार दिला? तुमच्या घरी आई-बहिणी असतील ना? हा कोणता नियम आहे? माझ्याकडे मारहाणीचे व्हिडिओ आहेत, हे बरोबर नाही," अशा शब्दांत जाब विचारला. तसेच पवन दत्ता नावाचा प्रांत अधिकारी हा परप्रांतीय आहे. त्यांना इथे कोणी आणले? गिरीश महाजन यांचा तो कलेक्टर आहे, असा गंभीर आरोप देखील राऊत यांनी केला.
दरम्यान, त्यानंतर राऊत यांना भेटून शिवसैनिक मारहाण झालेल्या महिला व ग्रामस्थांना सोबत घेऊन थेट जिल्हाधिकाऱ्यालयावर धडकले. शिवसैनिकांनी प्रांताधिकारी पवन दत्ता यांची भेट घेऊन त्यांना प्रत्यक्ष समोरासमोर जाब विचारला. यावेळी महिलांनीही घडलेली आपबिती सांगितली.
नेमकं प्रकरण काय?
नाशिक बाह्य परिक्रमा रस्त्याच्या (रिंग रोड) भूसंपादनासाठी जमीनीची मोजणी सुरु असून याविरोधात जिल्ह्यातील काही गावांमधील शेतकरी न्यायालयात गेले आहेत. असे असताना जमिनीच्या मोजणीसाठी गेलेल्या प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्यासह अधिकारी व पोलिसांनी मातोरी व मुंगसरे येथील ग्रामस्थांना घरात घूसुन मारहाण केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यात महिलांनाही मारहाण करत फरफटत घराबाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रशासन व पोलिसांनी मात्र मारहाण केल्याचा आरोप फेटाळला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.