Congress : काँग्रेसचे परंपरागत घराणे म्हणून ओळख असलेल्या थोरात - तांबे यांचा नाशिक पदवीधर मतदारसंघात नोंदणी केलेल्या दोन लाख मतदारांवर भरोसा असल्याचे चित्र आहे. राज्यात राजकीय समीकरणाचे कडबोळे झालेले असताना कोणताही धोका नको म्हणून सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली.
भाजपच्या पाठिंब्यासाठी मागणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असले तरी अद्याप याबाबत भाजप अथवा तांबे यांच्याकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. दरम्यान, सुमारे दोन लाख ७० हजार इतके मतदार असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे यांनी दोन लाखांच्या दरम्यान नोंदणी केली आहे.
डॉ. सुधीर तांबे या अगोदर काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीत सलग दोन वेळा विजयी झाले होते. यावेळी विविध संघटना, महाविद्यालये, शिक्षक संस्था आणि विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे यावेळी देखील हे मतदार पाठिशी राहतील, असे सत्यजीत तांबे यांनी 'सकाळ' शी बोलताना स्पष्ट केले.
सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण प्रदेशस्तरावरील प्रमुख नेत्यांनी डॉ. सुधीर तांबे यांनाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह पक्षश्रेष्ठीकडे केला. त्यानुसार सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झाली.
मात्र, त्यांनी उमेदवारी दाखल न करता सत्यजीत यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. या पक्षशिस्तभंगामुळे तांबे पितापुत्रावर निलंबनाची कारवाई झाली आहे. या सर्व घडामोडींवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अद्यापही मौन बाळगले असून त्यांच्या भूमिकेवर तांबे यांचे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा आहे.
नगर जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणे बदलणार?
बाळासाहेब थोरात हे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक मानले जातात. तर, शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील देखील विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक मानले जातात.
कपिल पाटील यांनी जाहीर सभा घेत सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी फारकत घेतल्याचे स्पष्ट आहे. तांबे यांची अपक्ष उमेदवारी, बाळासाहेब थोरात यांचे मौन आणि कपिल पाटील यांचा पाठिंबा याबाबत नगर जिल्ह्याच्या राजकारणात नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात येत असल्याचे दिसत आहे.
सत्यजीत तांबे यांनी भाजपला पाठिंबा मागितला तर राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी नगर जिल्ह्यातील विखे आणि थोरात-तांबे या घराण्यांचा भाजपला सर्वाधिक फायदा होऊ शकतो. तूर्तास भाजप अद्याप 'पाहा आणि थांबा'च्या भूमिकेत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.