BJP News: नाशिक पश्चिम मतदार मतदारसंघातून सोमवारी भाजपच्या आमदार सीमा हिरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र या मतदारसंघात रोज नवे पदाधिकारी बंडखोरीचे इशारे देत आहेत. बंडखोरीचे हे लोन थांबविण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करावा लागणार आहे.
भाजपने यंदा आमदार सीमा हिरे यांना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. जिल्ह्यातील विविध आमदारांप्रमाणे सीमा हिरे यांच्या विरोधात देखील पक्षातील विविध नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी मागितली होती.
विशेषता नाशिक पश्चिम मतदारसंघात हा दबाव अधिक होता. मात्र पक्षाने त्याला महत्त्व न देता आमदार हिरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आमदार हिरे सोमवारी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
योगायोग म्हणजे याच दिवशी भाजपचे माजी नगरसेवक शशिकांत जाधव हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. या मतदारसंघातून माजी सभागृह नेते दिनकर पाटील आणि शशिकांत जाधव या दोन नेत्यांनी भाजप विरोधात बंडखोरी केली.
या दोन्ही नेत्यांच्या नाशिक महापालिकेच्या प्रभागात भाजपचे प्रत्येकी चार असे आठ नगरसेवक आहेत. या आठ नगरसेवकांमधील वर्षा भालेराव, सौ कांडेकर, माधुरी बोरकर या आमदार हिरे यांच्या समर्थक आहेत. उर्वरित इंदुमती नागरे या तटस्थ आहेत. त्यांचे चिरंजीव विक्रम नागरे हेदेखील इच्छुक उमेदवार होते.
दिनकर पाटील शशिकांत जाधव, रवींद्र धिवरे, हे आमदार हिरे यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे मतदारसंघाचा विचार करता सातपूर विभागातून दिनकर पाटील यांनी बंडखोरी करीत मनसेत प्रवेश केला आहे. नगरसेवक शशिकांत जाधव हे अपक्ष उमेदवारी करणार आहेत.
त्यामुळे एकंदरच कामगारनगर परिसरातील काही भाग वगळता सबंध सातपूर परिसरातून भाजपला मते मिळविण्यासाठी परिश्रम घ्यावे लागेल. समर्थकांची यंत्रणा उभारावी लागेल. महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपमधील बंडखोरीने वेगळाच संदेश गेला आहे.
आमदार हिरे ज्या भागातील प्रतिनिधित्व करतात. त्या सिडको भागात महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे पक्षाचे सुधाकर बडगुजर हे उमेदवार आहेत. या भागातील माजी आमदार अपूर्व हिरे यांनी देखील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला आहेत.
एकंदरच आमदार हिरे यांना आपला पश्चिम मतदारसंघ सांभाळण्यासाठी आता ताकदीने प्रयत्न करावे लागतील. बंडखोरांना थंड करण्यासाठी पक्षाची यंत्रणा सक्रिय करावी लागेल. सध्या तरी भाजपची कोणतीही यंत्रणा बंडखोरांच्या संपर्कात नाही. एकंदरच भाजपमधील बंडखोरांचा प्रभाव आणि परिणाम दोन्ही वाढत असल्याने आमदार हिरे यांची डोकेदुखी दिवसागणीक वाढते आहे.
यावर कोणते औषध शोधायचे, यासाठी त्यांना योग्य नेतृत्वाची आणि सल्ल्याची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी कोण पुढे येतो? याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. एकंदरच केवळ विधानसभा नव्हे तर आगामी महापालिकेच्या दृष्टीने देखील भारतीय जनता पक्षाला आठ नगरसेवक विरोधात गेल्यासारखे आजची स्थिती आहे.ती सुधारण्यासाठी विधानसभेतच बंडखोरांना परावर्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.