Dindori constituency 2024 News : दिंडोरी लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या डॉ भारती पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांच्यात सरळ लढत आहे. दोघांनीही अतिशय जोरकसपणे प्रचार केला आहे.त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीची लढत आहे.
पाचव्या टप्प्यातील निवडणुकीचे मतदान 20 मे रोजी झाले. येत्या 4 जूनला मतमोजणी आहे. मात्र सध्या दोन्ही उमेदवारांचे समर्थक प्रत्येक मतदान केंद्रावर झालेल्या मतांच्या आकडेवारीवरून वेगवेगळ्या अंदाज बांधण्यात व्यस्त आहेत. या अंदाजामुळे उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी देखील त्रस्त झाले आहेत. रोज नवे अंदाज बांधले जात असल्याने राजकीय वातावरण अद्यापही शांत झालेले नाही.
यासंदर्भात दिंडोरी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक नाईकवाडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना पत्र लिहिले आहे.त्यांनी भगरे यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर आगामी काळात मतदारांच्या वाढलेल्या अपेक्षा नुसार कसे सक्रिय राहावे, याच्या सूचना देखील केल्या आहेत. शेतकरी (Farmer) आणि आदिवासी मतदार मोठ्या अपेक्षेने आपल्याकडे बघत आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडविणे आपले कर्तव्य आहे. याचा विसर पडू देऊ नये असे त्यांनी म्हटले आहे.
'आपण डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून आगामी पाच वर्षात प्रत्येक मतदाराची संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करावा. ती आपली महत्त्वाची निकड आहे. कारण प्रत्येक मतदार आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही'. मतदारांच्या अडीअडचणी समस्या खूप आहेत. त्याला न्याय देता यावा, म्हणून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक संपर्क कार्यालय असावे. तिथे अत्यंत कार्य कुशल प्रतिनिधी असावेत, असे नाईकवाडे यांनी पत्रात म्हटले आहे.
दिंडोरी लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात शेती, शेतकरी, शेतमजूर, आपत्ती व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, सिंचन व्यवस्था, धरणामधील गाळ, रस्ते, शिक्षण, सहकार, वाहतुकीच्या समस्या, शेतमालाची निर्यात, आणि दूध व्यवसायिकांच्या अडचणी आहेत. ही सर्व कामे करायची असल्यास खासदार म्हणून भगरे यांना सतत सक्रिय राहावे लागेल. भगरे यांनी यापूर्वीच्या खासदाराचा अनुभव लक्षात घेऊन त्यांचे संपर्क कार्यालयातील प्रतिनिधी योग्य असतील असे पाहावे.अन्यथा तेच स्वतःला खासदार समजून मतदारांना वागणूक देऊ लागल्यास पाच वर्षांनी आपली स्थिती अतिशय बिकट होईल. अशी समजही दिली आहे. नाईकवाडे यांनी लिहिलेले पत्र चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे. ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.