
Shridi News, 18 Jan : शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवसंकल्प शिबिराला सुरवात झाली आहे. या शिबिराला पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले आहेत. परंतु ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मंत्री धनंजय मुंडे हे अजून आलेले नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला तोंड फुटलं आहे. मंत्री धनंजय मुंडे हे शिबिराच्या दोन्ही दिवसात सहभागी होणार नाहीत.
ते आजारी असून परळी इथेच मुक्कामी असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज नसल्याचे सांगितले जात असले, तरी त्यांनी शिबिराकडे पाठ फिरवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) शिर्डी येथे नवसंकल्प शिबिर होत आहे. या शिबिराला राज्यभरातील नेते खासदार आमदार मंत्री आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे.
या शिबिराचे मुख्य आकर्षण हे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) होते. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे हे दोन्ही नेते चर्चेत आहेत. त्यामुळे ते शिबिराला उपस्थित राहणार की नाही, याबाबत उत्सुकता होती. मात्र, हे दोन्ही नेते शिबिराला आले नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चेला तोंड फुटलं आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) हे बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात आरोपी आहे. वाल्मिक कराड हा सध्या पोलिस कोठडीत आहे. वाल्मिक कराडवर हत्येच्या कट केल्याची गुन्ह्याची नोंद झाल्याने धनंजय मुंडे हे विरोधकांच्या रडारवर आले आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याशिवाय त्यांना पालकमंत्री पदावर नियुक्ती मिळू नये, असा देखील दबाव वाढवला जात आहे.
या शिबिराच्या काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांनी अजितदादा यांची मुंबई येथे भेट घेतली होती. त्यानंतर ते परळीला गेले. तेव्हापासून परळी येथे मुक्कामी असलेल्या मुंडे यांनी तिथे काल जनता दरबार देखील घेतला. परंतु ते आज शिबिराला आले नाहीत. आता शिबिर स्थळावर मंत्री धनंजय मुंडे आजारी आहेत. पुढच्या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे. अजितदादा व्यतिरिक्त पक्षातील मंत्री व अन्य नेते या पडत्या काळात सपोर्ट करत नसल्याची भावना मुंडे यांची झाली आहे, अशी चर्चा शिबिर स्थळी होती.
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात डावलण्यात आले. तेव्हापासून ते नाराज आहेत. तशी त्यांनी ही नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. यानंतर त्यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना सोडून भाजपचे नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.
समता परिषदेच्या माध्यमातून ते राज्यात वेगळीच चाचपणी करत असल्याचे दिसत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ते शिबिरात सहभागी होणार की नाही, याची देखील उत्सुकता होती. परंतु छगन भुजबळ यांनी शिबिराकडे पाठ फिरवल्याचे दिसते. मात्र पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी छगन भुजबळ नाराज नसल्याचं सांगितलं आहे.
मंत्री धनंजय मुंडे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे शिबिराला गैरहजेरी हा चर्चेचा विषय ठरली आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहे. त्यांची गैरहजेरी ही शिबिराच्या पहिल्याच दिवशी गडदपणे समोर आली. छगन भुजबळ यांच्या हा नाराजीचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना बसू शकतो. त्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे स्वतः प्रयत्न करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.