
Ahilyanagar temple gold stock : जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळं सोन्याचा भाव प्रतितोळा लाखांजवळ पोचला आहे. अशातच साईंच्या शिर्डीतून मोठी बातमी समोर आली आहे. आयुष्यभर फकीर बनून गोरगरिबांची-दीनदुबळ्यांची सेवा करणाऱ्या साईंच्या झोळीत आतापर्यंत पाचशे किलोंच्यावर सोने साचल्याचं समोर आलं आहे.
साई संस्थानकडे साचलेल्या या सोन्यामध्ये सर्वाधिक दागिने असून, ही संपत्ती तब्बल अडीचशे कोटी रुपयांवर पोचली आहे. आता संस्थानकडे देणगी स्वरुपात येणारे दागिने साठवायला सध्या जागा कमी पडत असल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान, साई संस्थानकडे पुरेशी जागा आहे. सोने ठेवण्यासाठी लवकरच जागा विस्ताराचं धोरण असून, तसा स्ट्राँग रुमचा प्रस्ताव असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी गेरक्ष गाडिलकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितलं.
साईंच्या झोळीत रोज वेगवेगळ्या स्वरुपात भाविकांची देणगी येत असते. सोन्याच्या देणगीत अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. हे सोने ठेवण्यासाठी साई संस्थानला आता जागा अपुरी पडू लागली आहे. स्टेट बँकेकडे (Bank) हे सोने ठेवायचा विचार केला जात आहे. तसं केल्यास त्यावर अडीच टक्के व्याज मिळू शकते. मात्र ही प्रक्रिया न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे देणगी स्वरूपात येणाऱ्या सोने साठविण्यासाठी विस्तारित जागा तयार करण्याची वेळ संस्थानवर येऊ शकते.
संस्थानकडे असलेल्या पाचशे किलो सोन्याच्या साठ्यात शंभर किलो वजनाच्या साई सिंहासनाचा समावेश आहे. मौल्यवान दागिने देखील आहेत. हे मौल्यवान दागिने जतन करावेत, असा न्यायालयाचा (Court) आदेश आहे. संस्थानकडील सूत्रांच्या माहितीनुसार सुमारे अडीचशे किलो वजनाचे सोने वितळवण्या योग्य आहे. त्यातील सुमारे 140 किलो वजनाच्या वस्तू वितळवून त्याची सुवर्ण नाणी तयार करावीत, असा निर्णय साई संस्थानने काही वर्षांपूर्वी घेतला. त्यास उच्च न्यायालयाने मान्यता दिली. मात्र श्रीरामपूर येथील अॅड. संदीप कुलकर्णी यांनी निर्णयाला आव्हान दिले.
संस्थानने तीन वेळा आपल्याकडील सोन्याच्या वस्तू वितळवून त्याची सुवर्ण नाणी तयार केली. ती अडीच, पाच, दहा आणि वीस ग्रॅम वजनाची होती. 37 किलो वजनाची सोन्याची ही नाणी होती. त्यातील सुमारे पाच किलो वजनाची नाणी अद्याप शिल्लक आहेत. दरवर्षी सुमारे दोन ते तीन किलो वजन भरेल एवढी नाणी विकली जातात. हे लक्षात घेतले, तर नव्याने तयार केलेली नाण्यांची विक्री व्हायला मोठा कालावधी लागेल आणि जोखीमच ठरेल, असे कुलकर्णी यांनी निरीक्षण नोंदवले आहे.
या दागिन्यांपासून सोन्यांची नाणी बनवणे ही किचकट प्रक्रिया आहे. त्याऐवजी दागिने स्वरूपातील सोने स्टेट बँकेकडे दिले, तर ते वितळून त्याचे बार केले जातील. बाजारभावानुसार साई संस्थानला त्यावर अडीच टक्के व्याज मिळेल. सोने सुरक्षित राहील आणि दरवर्षी पाच ते सात कोटी रुपये व्याजाची रक्कम साई संस्थानला मिळेल. मात्र साई संस्थानने त्यावर आपली बाजू मांडलेली नसल्याने ही बाब न्यायप्रविष्ट आहे.
संस्थानच्या तिजोरीत असलेले मौल्यवान दागिने म्हणजे सुवर्ण हार, कलात्मक मुकुट वगैरे दागिने वितळविण्यास न्यायालयाची परवानगी मिळणार नाही. मात्र 140 ते 240 किलो वजनापर्यंतच्या सोन्याच्या वस्तू वितळविता येतील. स्टेट बँक स्वतःच्या जोखमीवर या वस्तू घेऊन जाईल. त्या वितळवून त्याचे बार तयार करतील आणि त्यावर सोन्याच्या प्रचलित दरानुसार साई संस्थानला अडीच टक्के व्याज देईल. हे सोने देशाच्या कामी येईल आणि गरज भासेल त्यावेळी साई संस्थानला परत देखील घेता येईल, असेही कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.
द्वारकामाई मंदिरात साईबाबांनी आपल्या हयातीत अखंड धुनी प्रज्ज्वलीत केली. या धुनी शेजारच्या भिंतीला टेकून बाबा उभे राहात. या भिंतीवर यापूर्वी श्रद्धा आणि सबुरी ही बाबांच्या शिकवणुकीचा संदेश देणारी सोन्याची अक्षरे लावण्यात आली. आज त्याच्या वरच्या बाजूस ‘ओम-साई’ ही सुवर्ण अक्षरे लावण्यात आली. दुबई येथील एका साईभक्ताने 270 ग्रॅम वजनाची आणि सुमारे चोवीस लाख रुपये मूल्य असलेली ही सुवर्ण अक्षरे साई संस्थानला दान स्वरूपात दिली. विशेष म्हणजे आपले नाव जाहीर न करण्याची विनंती या देणगीदाराने साई संस्थानला केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.