Nashik Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात झाडू मारून स्वच्छता केली. या मुद्द्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी टीकेची झोड उठवली. दोन दिवसांपासून शहरात स्वच्छता केली जाते आहे. काळाराम मंदिर दोन दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. अशावेळी मोदींनी तेथे साफसफाई करून काय मिळवले, असा प्रश्न करंजकरांनी उपस्थित केला आहे. करंजकरांनी केलेल्या टीकेमुळे भाजप आणि शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय युवा अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) शहरात आले होते. रोड शोनंतर ते काळाराम मंदिरात गेले. तिथे त्यांनी झाडू मारून साफसफाईसुद्धा केली. तसेच हाच संदेश त्यांनी जाहीर सभेमध्येसुद्धा दिला. २२ तारखेपर्यंत आपल्याजवळच्या मंदिरांमध्ये स्वच्छता करण्याचे आवाहन मोदी यांनी यापूर्वीच केले होते. तसेच त्यांनी स्वत: काळाराम मंदिरात स्वच्छतादेखील केली. नेमकी याच मुद्यावरून करंजकर यांनी मोदींवर निशाणा साधला.
'वास्तविक इकडे-तिकडे झाडू मारता-मारता मोदी थेट गोरगरिबांचा पैसा काढून धनदांडग्यांच्या घशात घालत आहेत,' असा आरोपही विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी केला आहे. ते म्हणाले, 'दोन दिवस प्रशासनाने रस्ते साफ केले. मंदिरांमध्येही स्वच्छता करण्यात आली. असे असताना पुन्हा मोदींनी स्वच्छता करून काय साधले? कांदा निर्यातबंदी, मराठा समाजाचे आरक्षण, वाढती महागाई या मुद्यांवर मोदी काहीच बोलले नाहीत,' याकडे करंजकर यांनी लक्ष वेधले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रस्त्यावर सर्व गुजराती लोक...
युवा अभियानासाठी खरोखर नाशिककर होते काय, असा सवालही करंजकरांनी उपस्थित केला. 'छत्रपती संभाजीनगर हायवेलगत असलेल्या लॉन्सबाहेर सर्वाधिक गुजरात राज्यातून आलेली वाहने उभी आहेत. गुजरातमधूनच ही गर्दी जमा करण्यात आली. नाशिकच्या शेतकऱ्यांची स्थिती लपून राहिलेली नाही. त्यामुळे नाशिककरांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे,' असा दावाही करंजकरांनी केला.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.