जळगाव : पोलिस उपमहानिरीक्षकांच्या (Maharashtra Police) विशेष पथकाने सातपुडा पर्वत पायथ्याशी बिडगाव (ता. चोपडा) (Jalgaon) येथे रिफाइंड तेलापासून दूध तयार करणाऱ्या टोळीतील तीन संशयितांना अटक केली. मात्र, त्यांचा म्होरक्या पळून जाण्यात यशस्वी ठरला. या टोळीकडून तब्बल ११. १८ लाखांच्या मुद्देमालासह बनावट दूध जप्त करण्यात आले.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरिक्षक डॉ. बी. जे. शेखर-पाटील यांच्या विशेष पथकातील वरिष्ठ निरीक्षक बापू रोहम जिल्हा गस्तीवर असताना त्यांना गुप्त बातमीदाराने रसायनापासून दूध निर्माण करणाऱ्या कारखान्याची माहिती दिली.
माहितीची खात्री करण्यासाठी पथकातील सचिन जाधव, रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, प्रमोद मंडली. मनोज दुसाने, सुनील दामोदरे, संजय हिरवरकर, कुणाल मराठे, सुरेश टोंगरे, बशीर गुलाब तडवी यांच्या पथकासह अन्नसुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन अशांनी ‘सर्च ऑपरेशन’ सुरू केले. बिडगाव (ता.चोपडा) येथील कुंड्यापाणी येथे संभाजी पाटील यांच्या शेतात घातक रसायनांपासून दूध तयार करण्याचा कारखाना चालवला जात असल्याची खात्री झाल्यावर पथकाने मध्यरात्री चहूबाजूने सापळा रचत छापा टाकला. यात झोपडीच्या आडोशाला दोन महिंद्र पिक-अप आढळून आल्या. तेथे तीन व्यक्ती बल्बच्या प्रकाशात दुधाच्या कॅनमध्ये मिक्सरच्या साहाय्याने मिश्रण टाकत असताना आढळून आले.
पथकाने छापा टाकून भिकन अशोक साळुंखे (वय २५, रा. चिंचोली, यावल), हेमंत रतिलाल महाजन (४२, रा. धानोरा, ता. चोपडा), सारा बुटा भरवाड (४०, मूळ रा. लिंबडी, जि. सुननगर, गुजरात. ह. मु. बिडगाव कुड्यापाणी) अशा तिघांसह विनानंबर पिक-अप व्हॅनजवळ उभा हर्षल पंढरीनाथ पाटील (१८, रा. चिंचोली, ता. यावल) या वाहनचालकासह चौघांना ताब्यात घेतले. अन्न व सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांच्यासमक्ष ताब्यात घेतलेल्या चौघांची विचारपूस केली असता त्यांनी बनावट दूध तयार करण्याचा अड्डा लक्ष्मण देवा भरवाड (रा. पळासनेर, ता. शिरपूर) याच्या मालकीचा असल्याचे सांगितले. बनावट रसायनयुक्त दूध तयार करण्यासाठी घटनास्थळावर ८५ किलो पामतेल, २० किलो दूध भुकटी मिळून आली.
रसायनांपासून तयार होणाऱ्या या बनावट दुधाचे वाटप जळगाव, धुळे, नंदुरबारसह नाशिक जिल्ह्यात करण्यात येत असल्याचा प्राथमिक अंदाज असून, अटकेतील चौघा संशयितांचा म्होरक्या फरारी आहे. त्याच्या अटकेनंतर अधिक माहिती उपलब्ध होईल.
बापू रोहम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.