

Shrirampur MHADA Colony Attack : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात मध्यरात्री काही जणांनी घरात घुसून महिलेसह कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. घरातील साहित्याची तोडफोड केली.
तसेच सोन्याची पोत, रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे घेऊन पसार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही घटना श्रीरामपुरात घडूनही संबंधित महिलेने भीतीपोटी थेट राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी सोनाली काकासाहेब दिवे (वय 35, श्रीरामपूर) यांनी राहुरी पोलिस (Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंकुश जेधे, विकास जगधने, रुद्र जगधने आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहा ते सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास काकासाहेब दिवे हे रिक्षा चालवून घरी परतले होते. त्यावेळी म्हाडा कॉलनीच्या पाठीमागील भागात आरोपींनी (Crime) त्यांना अडवून नशेत शिवीगाळ केल्याचे त्यांनी पत्नीला सांगितले. त्यानंतर काही वेळातच आरोपी थेट दिवे यांच्या घरात घुसले.
सोनाली दिवे यांनी आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी अंकुश जेधे याने त्यांना जोरात ढकलल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी हातातील काठ्या आणि लोखंडी रॉडच्या सहाय्याने घरातील फ्रिज, कुलर, मिक्सर, टीव्ही आणि इतर साहित्याची तोडफोड सुरू केली.
फिर्यादीने जाब विचारताच आरोपींनी “तुझा नवरा माजला आहे” असे म्हणत शिवीगाळ केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या वेळी विकास जगधने याने गावठी कट्ट्यासारखे हत्यार दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. तर रुद्र जगधने आणि इतरांनी घरात आरडाओरड करत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या गोंधळात आरोपी अंकुश जेधे याने फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे दोन ग्रॅम वजनाची अंदाजे 10 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. तसेच घरातील कुलरवर ठेवलेले सुमारे सात हजार रुपये रोख, वाहन परवाना, आधारकार्ड, पॅनकार्ड यांसह महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकीट आणि चाव्यांचा जुडगाही आरोपी घेऊन गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर सोनाली दिवे यांनी आरडाओरड करताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र जाताना “श्रीरामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. त्यामुळे भीतीच्या वातावरणात श्रीरामपूरऐवजी थेट राहुरी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.
शहरात घडलेल्या एवढ्या गंभीर घटनेची तक्रार दुसऱ्या तालुक्यात जाऊन द्यावी लागल्याने श्रीरामपूर शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण पसरले असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.