Congress Vs BJP News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांत चांगलीच झुंज लागली आहे. निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन दोन्ही पक्षांच्या नेत्यांत एकमेकांवर शरसंधान केले जात आहे.
काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर यांच्या नेतृत्वाखाली दोंडाईचा मतदारसंघात संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. भाजपकडून होत असलेला गैरकारभार आणि मतदारांना धमकावण्याचे प्रकार थांबविण्यासाठी ही मोहीम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मतदार संघातील प्रत्येक गावात जाऊन मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे काम काँग्रेस करीत आहे. खासदार डॉ शोभा बच्छाव यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर ही यात्रा सुरू करण्यात आली आहे. ढोल, ताशांच्या गजरात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावागावात जाऊन बैठका व सभा घेत आहेत.
गेल्या वीस वर्षात मतदार संघात सुरू असलेली दहशत आणि विकास कामांच्या नावाखाली झालेला गैरकारभार उघडकीस आणण्यासाठी ही मोहीम आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, असा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे. या निमित्ताने गेली वीस वर्षे सत्तेपासून दूर असलेल्या भाजप विरोधकांना संधी मिळेल असा विश्वास त्यांना वाटतो.
काँग्रेसची ही यात्रा चर्चेचा विषय ठरली आहे. निवडणुकीच्या आधीच काँग्रेसने भाजप विरोधात प्रचार सुरू केला आहे. प्रत्यक्षात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. त्यांनी येथून उमेदवार देखील निश्चित केल्याची चर्चा आहे. या संपर्क रॅलीचा लाभ राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार रावल यांनी नुकतीच मतदार संघात शेतकरी संवाद यात्रा काढली. या यात्रेवरही काँग्रेसने टीका केली आहे. ही यात्रा नसून मतदारसंघात विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप त्यांनी केला.
आमदार रावल यांनी मतदारसंघात संवाद यात्रा काढली. या यात्रेमध्ये पोलिसांच्या चार गाड्या होत्या. यातील दोन जाळीचे डबे असलेल्या गाड्या होत्या. एवढा पोलीस बंदोबस्त कशासाठी होता? मतदार संघातील नागरिकांना धमकवण्यासाठी होता की, आमदारांना स्वतःच्या मतदारसंघात नागरिकांची भीती वाटत आहे.
या भीतीपोटी आमदार पोलीस बंदोबस्तात फिरत आहेत का? असा प्रश्न सनेर यांनी केला. मतदार संघातील विकास कामे केल्याचा दावा भाजपचे पदाधिकारी करतात. मात्र ही विकास कामे कमी आणि भाजपने त्यांच्या सोयीसाठी झालेली कामे अधिक आहेत.
मतदारसंघातील वनजमिनींच्या घोटाळ्यांपासून तर अनेक गैरप्रकार राजरोसपणे सुरू आहेत. भाजपचे पदाधिकारी त्यात सहभागी आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल प्रशासन घेत नाहीत. प्रशासनावर आमदारांचा दबाव आहे. या सर्व कारणाने काँग्रेस पक्ष हे गैरप्रकार लवकरच उघड करील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवराज करणकाळ, माजी खासदार बापू चौरे, दीपक अहिरे, सुनील चौधरी, दीपक देसले, पांडुरंग माळी, रामकृष्ण धनगर यांसह विविध पदाधिकारी या यात्रेत सहभागी झाले. मतदारसंघातील सर्व गावांमध्ये जाऊन मतदार आणि नागरिकांशी संपर्क केला जाणार असल्याचे, यावेळी सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.