डॉ. राहुल रनाळकर
नाशिक : गुरू-शिष्याचं (Teacher & Students) अत्यंत भावनिक (Emotional) असं नातं आपल्याकडे पूर्वापार रूढ झालेलं आहे. पण सध्याच्या व्यावसायिकीकरणाच्या नावाखाली शिक्षणाच्या (Education) मूळ मूल्यव्यवस्थेला धोका पोचत असल्याचं दिसून येतं. यंदाच्या शिक्षकदिनी (Teachers day) यावर विचारमंथन (Brainstorming) व्हायला हवं. (Education field shall focus on student & Quality education)
सरकारी शाळा, खासगी शाळा, अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा अशा अनेक प्रकारांत शाळांची विभागणी आहे. पण या सगळ्यांचं एकच प्रमुख लक्ष्य आहे आणि असलं पाहिजे ते म्हणजे विद्यार्थी कल्याण. आजचा विद्यार्थी जर देशाचा उद्याचा जबाबदार नागरिक असेल, तर त्यात सर्वांत प्रमुख भूमिका ही शिक्षण व्यवस्थेची आहे.
शिक्षणाबद्दल जेवढं लिखाण, चिंतन, मनन प्रसिद्ध होतं किंवा जेवढी चर्चा समाजात होते, तेवढी अन्य कुठल्याही विषयाची होत नाही. शहरी असो वा ग्रामीण, प्रत्येक कुटुंबातील मुलं शाळांमध्ये जातात. शाळांचे, शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शासनाचे अनेक प्रश्न शिक्षणाशी संबंधित आहेत.
शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असताना या शिक्षकांकडे मात्र शासन गरजेएवढं लक्ष पुरवत नाही. राज्यभरात शिक्षकांची ३१ हजार पदे रिक्त आहेत. अशैक्षणिक कामांचा मोठा ताण शिक्षकांवर असतो, त्यासाठी शासनाकडून प्रयत्न व्हायला हवेत. शिक्षकांचे प्रश्न आणि शिक्षणासमोरचे प्रश्न यांचा धांडोळा घ्यायचा झाल्यास त्यावर मोठी लेखमालिका किंवा खंडात्मक पुस्तकं होऊ शकतील, एवढी ही प्रश्नांची जंत्री आहे. तथापि सध्याच्या उपलब्ध गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगलं काय करता येणं शक्य आहे, यावरही विचार व्हायला हवा. अनेक प्रयोगशील शिक्षक ग्रामीण, आदिवासी भागांमध्ये ज्ञानदानाचं उत्तम काम करत आहेत. त्यांच्या कार्याला सलाम करायला हवा. अगदी महापालिकेतील शिक्षकदेखील चांगलं काम करत आहेत. नाशिक महापालिकेतील शिक्षकांनी कोरोनाकाळात आणि त्यानंतर गरीब कुटुंबातील मुलांसाठी केलेल्या कामाचं मोठं कौतुक होतंय, ही बाबदेखील लक्षणीय आहे.
शाळांची किंवा शिक्षणप्रवाहाची दोन प्रमुख गटांमध्ये विभागणी करायची झाल्यास शहरी आणि ग्रामीण तसेच सरकारी आणि खासगी शाळा, अशी करावी लागेल. सध्या अगदी छोट्यातल्या छोट्या गावांमध्ये देखील पालकांचा ओढा खासगी शाळांकडे आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहेत. पटसंख्या दर वर्षी घसरतेय. अनेक शाळा दोन शिक्षकी तसेच एक शिक्षकी आहेत. शिक्षकेतर एकही कर्मचारी हजारो शाळांमध्ये नाही. सरकारी शाळांमध्ये प्रामुख्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या पालकांची मुले आहेत. फी शून्य, गणवेश, दप्तर, शैक्षणिक साहित्य जवळपास मोफत आणि शिवाय खिचडीची सोय आहे. तरीदेखील निम्न आर्थिक स्तरातील कुटुंबांमधील मुलं या शाळांमध्ये पाठवण्यासाठी पालक तयार नाहीत. खासगी शाळांनी ग्रामीण भागात चांगल्या रीतीने बस्तान बसविले आहे. आर्थिक गणितही त्यांनी जुळवली आहेत. काही खासगी शाळा चांगल्या दर्जाच्याही आहेत, पण शिक्षकांच्या गुणवत्तेच्या स्तराचा विचार करता सरकारी शाळांमधील शिक्षकांपेक्षा तो नक्कीच कमी आहे. ज्यांची आर्थिक क्षमता नाही, अशा पालकांमध्ये पिवळ्या व्हॅनची क्रेझ निर्माण झाली आहे. अर्थात, आपल्या पाल्यांना चांगलं शिक्षण मिळावं, हा प्रामाणिक हेतू त्यामागे आहे. पण हे करत असताना शाळांची निवड करण्याची क्षमता या पालकांमध्ये नाही, हे सरकारी शाळांच्या पटसंख्येवरून स्पष्ट होते.
सध्या आणि भविष्यात मुलांसमोरची आव्हान वेगळ्या स्वरूपाची असणार आहेत. कुणी विचारही केलेला नसेल, अशा प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागेल. त्या वेळी भारतीय संस्कृतीमधील मूळ प्रेरणा या पिढीला अत्यंत उपयोगी ठरणाऱ्या आहेत.
वेळेत शाळेत पोचणे, प्रार्थना-परिपाठ नियमित म्हणणे, नीतीमूल्यांचे धडे, स्वच्छतेचं महत्त्व, स्वयंस्फूर्तीने अशा कामांत सहभागी होणं, स्वावलंबनाचे धडे, सहनशीलतेचं मूल्य रुजविणे अशा अनेक गोष्टींचा संस्कार पूर्वीच्या गुरू-शिष्य परंपरेतून आपोआप मिळत होता. सध्या कुठेतरी या संस्कारांचा अभाव दिसून येत आहे. सध्या शाळादेखील फॅशनेबल झाल्या आहेत. शाळांना इव्हेंटची भुरळ पडली आहे. भाड्याने ड्रेस आणून सण साजरे करायचे, स्पर्धा घ्यायच्या, हे एका मर्यादेपर्यंत ठीक असलं तरीदेखील बहुतांश ठिकाणी या मर्यादा कधीच ओलांडल्या गेल्या आहेत. ग्रामीण भागाचा विचार करता तिथल्या मुलांकडे वेळ असल्यानं सरकारी शाळेतील शिक्षक त्यांच्यावर संस्कार करण्यात, त्यांना घडवण्यात बऱ्याच अंशी यशस्वी होत आहेत. प्रतिकूलतेत जेवढा विकास होतो, तेवढा अनुकूलतेत होत नाही. त्यामुळे मुलांना काहीअंशी प्रतिकूलतेत ठेवणं गरजेचं आहे. मुलांना ‘कन्फर्ट झोन’ देण्याच्या नादात पालक चूक करत आहेत. गॅजेट्सपासून दूर असलेली ग्रामीण भागातील मुले भविष्यात उत्तम आणि मोठं कार्य निर्माण करू शकतात, हे सध्याचं वास्तव प्रकर्षानं जाणवतं. त्यामुळेच मुलांच्या विकासासाठी, त्यांच्या कल्याणासाठी गुरू-शिष्य परंपरा टिकवण्यासाठी शहरी भागातील शाळांना आणि शिक्षकांनाही काही मूलभूत बदल करावे लागणार आहेत. किंबहुना ती काळाची सर्वांत महत्त्वाची गरज ठरेल.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.