नाशिक : पाणी म्हणजे जीवन. रोजच जगणं म्हणजे देखील जीवन. या जगण्यासाठी कोणाला काय काय यातना, कसरती कराव्या लागतील याचा नेम नाही. हे कष्ट चुकतही नाही. मात्र आकाशाला भरारी घालणाऱ्या विमानांची, सुसाट धावणाऱ्या गाड्यांची निर्मिती करणाऱ्या नाशिकच्या (Nashik) अगदी उशालाच काही महिलांना (Womens) हंडाभर पाण्यासाठी रोजच मृत्यूला शिऊन यावे लागते हे देखील विदारक सत्य आहे.
खरशेत (ता. त्र्यंबकेश्वर) ग्रामपंचायतीच्या परिसरात बारा पाडे असून, गावातील अनेक कुटुंब शेतीसाठी पाड्यापासून दीड किलोमीटरवरील तास नदीच्या काठी वास्तव्यास आहेत. पंचवीस वस्त्यांमधील आदिवासींची संख्या तीनशेहून अधिक असून इथल्या महिलांना रोजच्या पिण्याच्या पाण्यासाठी नदीवर टाकण्यात आलेल्या बल्ल्यांवरून चालत जाण्याची, डोंबारींपेक्षाही भयानक कसरत दररोज करावी लागते.
सरकारी अनेक योजना गावात येतात; परंतु वस्तीपर्यंत पोचत नाहीत, ही येथील आदिवासींची व्यथा आहे. वस्तीपासून नदीजवळ आहे; पण पाणी शुद्ध नसल्याने झऱ्यांमधून महिलांना पाणी आणावे लागते. झरे नदीच्या पलीकडे असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत येथील महिलांना करावी लागत आहे. हरसूलकडून येणारी तास नदी येथून वाहते. या नदीच्या दोन्ही बाजूला काळे पाषाण असून, तीस फूट खोल आहे. नदीचे पात्रदेखील वीस- पंचवीस फूट खोल आहे. नदीपलीकडे जाण्यासाठी महिलांची कसरत ठरलेली असते. दररोज जगणे-मरण्याचा संघर्ष महिलांचा पाण्याच्या निमित्ताने ठरलेला आहे. बल्लीवरून पाय सरकल्यास थेट खोल नदीत पडण्याची शक्यता असते. अनेक ग्रामस्थ नदीत कोसळले आहेत.
सागाच्या बल्लीवरून विद्यार्थी हरसूल, पेठ आदी भागात शिक्षणासाठी जातात. वस्तीकडे येण्यासाठी सावरपाडा-शेंद्रीपाडा रस्ता व्हावा, अशी मागणी आदिवासींची आहे. सावरपाडापासून हरसूलला जाण्यासाठी चाळीस रुपये लागतात. हा रस्ता झाल्यास वीस रुपये भाडे पुरेसे ठरणार आहे. परिसरातील इतर नद्यांवर पूल बांधले गेले आहेत. मात्र तासवर पूल न झाल्याने दुष्काळातील तेरावा महिना दूर व्हायला तयार नाही.
नदीच्या बाजूला शेती करत असलो तरी वीज नसल्याने पाण्याचे इंजिन लावणे परवडत नाही. पावसाच्या भरवशावर पिके घ्यावी लागतात. वीजजोडणी झाल्यास बारमाही पिके घेता येतील, असे भगवान खोटरे यांनी म्हटले आहे.
...
शेती करण्यासाठी अनेक वस्त्या गावापासून दूर नदीच्या बाजूला वसल्या आहेत. या वस्त्यांवर आम्ही वर्षभर राहातो. आमच्या वस्तीवरील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीवरील सागाच्या बाल्लीवरून प्रवास करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी नदीवर लोखंडी पूल व्हावा.
-अमृत राऊत (ग्रामस्थ)
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.