Nashik Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पारंपारिक ध्वजारोहणाने होणार असून, हा सोहळा २४ जुलै २०२८ पर्यंत चालणार आहे. कुंभमेळा अगदी जवळ आल्याने प्रशासनाकडून तयारीला वेग आला असून कुंभमेळामंत्री म्हणून गिरीश महाजन हेच सुरुवातीपासून सर्व नियोजन करत आहेत. आता नाशिकचे पालकमंत्री व कुंभमेळा मंत्री अशी दुहेरी जबाबदारी ते बघत आहेत.
आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे १२ कोटी भाविक येतील असा अंदाज महाराष्ट्र सरकारने वर्तवला आहे. एका दिवशी २.५ कोटी भाविकांची उपस्थितीती राहू शकते. कुंभमेळ्यातील गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियत्रंण करण्यासाठी यापूर्वी प्रशासनाच्या अनेकदा बैठका झाल्या प्रयागराजला जे झालं ते नाशिकमध्ये होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असून त्यापद्दतीने नियोजन सुरु असल्याचा दावा सातत्याने प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना त्र्यंबकेश्वरमध्ये घडलेल्या एका घटनेनं मात्र, सगळ्यांचे डोळे उघडले आहेत. पहिल्याच श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक भाविक दाखल झाल्याने प्रशासनाचे नियोजन कोलमडले. भाविकांच्या रेट्यात चेंगराचेंगरीची घटना टळली, अशी कबुली कुंभमेळा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: दिली. सिंहस्थाच्या तयारीच्या दृष्टीने ही घटना प्रशासनासाठी धडा असून, श्रावण महिन्यात व्हीव्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
नुकताच, त्र्यंबकेश्वर येथील श्रावण महिन्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात महाजन यांनी घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, पहिल्याच सोमवारी अपेक्षेपेक्षा मोठ्या संख्येने भाविक आल्याने यंत्रणेवर ताण आला. यापुढे गर्दीचे योग्य नियोजन करून भाविकांना सुलभ दर्शन मिळेल, याची व्यवस्था केली जाईल असं महाजनांनी सांगितलं.
श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये आलेली गर्दी ही कुंभमेळ्याच्या तुलनेत अत्यंत लहान असली, तरी या घटनेने प्रशासनाच्या नियोजनाची प्रत्यक्ष मैदानावरील तयारी किती सक्षम आहे, याची झलक दाखवली आहे. लाखो नव्हे तर कोट्यवधी भाविक एकाच वेळी दाखल होण्याची शक्यता असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दीचे नियोजन, प्रवेश-निर्गमन मार्ग, वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन यंत्रणा आणि भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारी निर्माण झालेली परिस्थिती केवळ एका दिवसाची गैरसोय मानून चालणार नाही, तर ती कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मिळालेला गंभीर इशारा आहे.
विशेष म्हणजे, प्रशासनाकडून कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन सुरू असल्याचे सातत्याने सांगितले जात असताना पहिल्याच मोठ्या गर्दीच्या प्रसंगी यंत्रणेवर ताण आल्याची कबुली खुद्द पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यामुळे आता कागदावरील नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील अंतर कमी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. श्रावणी सोमवारी मोठा अनर्थ टळला; मात्र कुंभमेळ्याच्या गर्दीच्या महासागरापूर्वी ही घटना प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरली आहे. या घटनेतून धडा घेत तातडीने त्रुटी दूर केल्या नाहीत, तर सिंहस्थाच्या काळात निर्माण होणारी प्रचंड गर्दी प्रशासनासाठी मोठी परीक्षा ठरू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.