Ahmednagar News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. यानंतर राज्यातील त्यांचे काँग्रेसमधील समर्थक हळूहळू त्यांच्याबरोबर जोडले जाऊ लागले आहेत. अशोक चव्हाण यांचे नगरमधील खंदे समर्थक आणि प्रदीर्घ काँग्रेसमधील ज्येष्ठ पदाधिकारी विनायक देशमुख यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ते आता भाजपच्या कार्यक्रमांना हजेरी लावू लागले आहेत.
नगर तालुक्यातील भाजपच्या एका कार्यक्रमाला आज खासदार सुजय विखे आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याबरोबर देशमुख हे सहभागी झालेले दिसून आले. यानंतर आता "माझ्या जीवनाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून झाली आहे, आता शेवट भाजपमध्ये होईल", अशी प्रतिक्रिया विनायक देशमुख यांनी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विनायक देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला. विनायक देशमुख यांनी अगदी तीन ओळीत राजीनामा पाठवत काँग्रेसला डिवचत बाहेर पडले. विनायक देशमुख हे अशोक चव्हाण यांच्यासह राधाकृष्ण विखे यांचे समर्थक मानले जातात. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नगर जिल्ह्यातून विनायक देशमुख काँग्रेस पक्ष सोडतील, अशी चर्चा होती. तशी ती विखे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यावेळीदेखील होती.
विनायक देशमुख यांचे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात आणि काँग्रेसमधून त्यांनी इतर राज्यात प्रभारी, निरीक्षण, समन्वयक म्हणून काम केले असल्याने इतर राज्यातही त्यांचा सर्वच पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर दांडगा संपर्क आहे. विनायक देशमुख यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पुढे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले होते.
यातच त्यांनी नगर तालुक्यातील वाळुंज येथे भाजपच्या एका राजकीय कार्यक्रमात आज उपस्थिती लावली. खासदार सुजय विखे आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याबरोबर ते बसलेले होते. विनायक देशमुख यांची ही कृती जवळजवळ भाजपमध्ये जागा निश्चित करण्यासाठी असल्याचे मानले जाते.
दरम्यान, विनायक देशमुख यांनी दिलेल्या राजीनाम्याची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याचे समजते. काँग्रेसचे आज लोणावळा येथे चिंतन शिबिर सुरू आहे. काँग्रेसचे दिल्ली, महाराष्ट्र येथील सर्वच नेते आणि पदाधिकारी या शिबिरामध्ये आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी पूर्वी दिलेली प्रतिक्रिया या वेळी काँग्रेसमधील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी पुन्हा ऐकवली.
"काँग्रेसला नव्याने पालवी फुटत आहे. काँग्रेस हा संपणारा पक्ष नाही. तो एक विचार आहे. कोणता एक नेता म्हणजे काँग्रेस नव्हे", अशी प्रतिक्रिया थोरात यांनी काँग्रेसमधील गळतीवर दिली होती. तीच प्रतिक्रिया आता काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी सांगत आहेत.
या सर्व घडामोडींवर देशमुख म्हणाले, "मागील 32 वर्षे काँग्रेसच्या व्यासपीठावर भाषण केले. आता पहिल्यांदाच भाजपच्या व्यासपीठावर भाषण करतोय. विखेंच्या तीन पिढ्यांसोबत काम करण्याचा योग आला. भाजपमधील सर्वच नेत्यांसोबत कायम माझा स्नेह राहिला आहे. विखे कुटुंबीयांनी ताकद दिल्यानेच जिल्ह्यातील राजकारणात टिकून राहिलो. माझ्या जीवनाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातूनच झाली, तर जीवनाचा शेवट भाजपमध्ये करतोय. पक्ष जी जबाबदारी देईल, ती योग्यपणे पार पाडेल. आता विखे आणि चव्हाण एकाच विचारसरणीत आलेत, असेही देशमुख म्हणाले.
Edited By-Ganesh Thombare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.