जळगाव : जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचे बहुमत आहे. बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक आज होत आहे. सुरवातीचे तीन वर्षे राष्ट्रवादीचा अध्यक्ष असेल हे सुत्र ठरले आहे. या पार्श्वभूमीवर गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar), एकनाथ खडसे (Eknath Khadse), रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांची नावे स्पर्धेत आहेत. मात्र एैनवेळी एकनाथ खडसे की रोहिणी खडसे यातूनच एक नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिक संचालक आहेत, त्यामुळे या पक्षाचा अध्यक्ष होणार आहे. गुरुवारी झालेल्या पक्षाच्या कोअरकमेटी बैठकीत नाव जाहीर झाले नाही, शुक्रवारी सकाळी निवडणुकीच्या अगोदर सकाळी अकराला नाव जाहीर करण्यात येणार आहे.
अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आहे, याबाबत प्रश्नचिन्ह असले तरी गुलाबराव देवकर यांचे नाव अग्रस्थानी आहे, मात्र विद्यमान चेअरमन ॲड. रोहिणी खडसे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता असली तरी ऐनवेळी एकनाथ खडसे हे सुद्धा अध्यक्ष होण्याचे बोलले जात आहे.
जळगाव जिल्हा बँकेत बहुमत असलेल्या महाविकास आघाडीच्या कोअर कमिटीची आज अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. अध्यक्षस्थानी एकनाथ खडसे होते. तर राष्ट्रवादीतर्फे गुलाबराव देवकर, कॉंग्रेसतर्फे प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी, शिवसेनेतर्फे आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील आदी उपस्थित होते.
असा आहे फॉर्म्युला
याबाबत माहिती देताना एकनाथ खडसे यांनी सांगितले, महाविकास आघाडीचा जिल्हा बँक अध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. यात अध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसला तीन वर्षे, शिवसेनेला दोन वर्षे, तर उपाध्यक्षपद शिवसेनेला दोन वर्षे, कॉंग्रेसला दोन वर्षे व राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक वर्षे देण्यात येणार आहे. याला महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी सहमती दिली आहे.
सभागृहात ठरणार अध्यक्षपदाचे नाव
अध्यक्षपदाबाबत बोलताना खडसे म्हणाले, की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच जिल्हा बँकेचा अध्यक्ष होईल. अध्यक्ष निवडीसाठी अजित पवार यांनी आपल्याला पूर्ण अधिकार दिले आहेत. संचालकाच्या उद्या (ता.३) होणाऱ्या बैठकीत नाव निश्चित करण्यात येईल व त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल.
खडसे होणार की, खडसे?
जिल्हा बँक अध्यक्षपदी कोण होणार याची उत्सुकता अधिक आहे, विद्यमान अध्यक्ष ॲड.रोहिणी खडसे यांना पुन्हा एक वर्षासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे, मात्र जर त्याला सहमती झाली नाही तर एकनाथ खडसे अध्यक्ष होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा बँक संचालक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागा वाढविण्यासाठी तसेच महाविकास आघाडीतील संचालक अधिक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे एकनाथराव खडसे यांच्याकडे सध्या कोणतेही पद नाही, त्यांच्या कन्या ॲड.रोहिणी खडसे यांच्याकडेही पद नसणार आहे, त्यामुळे त्यांच्याकडे सद्यःस्थितीत एक पद असावे असे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला तीन वर्षे अध्यक्षपद मिळणार असल्याने खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना एक वर्ष मुदतवाढ देवून अध्यक्ष करण्यात यावे असा निर्णय होण्याची शक्यता आहे. गुलाबराव देवकर तसेच इतर इच्छुकांना पुढील वर्षी पद देण्यात यावे असा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. मात्र, जर हा प्रस्ताव मान्य झाला नाही, अधिक कलह झाला तर अंतिम क्षणी एकनाथ खडसे प्रथम वर्षी अध्यक्ष होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.