Food Poisoning : खळबळजनक! गडचिरोली आश्रमशाळेच्या शंभरहून अधिक विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा

Sode Ashram School : ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून 73 मुलींची प्रकृती खालावली आहे.
Sode Ashram School
Sode Ashram SchoolSarkarnama
Published on
Updated on

Gadchiroli News : मुलींच्या शासकीय आश्रमशाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. हा प्रकार गडचिरोली जिल्ह्यामधील धानोरा तालुक्यातील सोडे गावात बुधवारी (20 डिसेंबर) घडला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हा प्रकार घडल्याने सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने गडचिरोलीकडे धाव घेतली आहे.

विषबाधा झालेल्यांपैकी 73 विद्यार्थिनींची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्नातून नेमकी किती जणांना विषबाधा झाली, याची माहिती गोळा करण्याचे काम बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शंभरहून अधिक विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sode Ashram School
Maharashtra Assembly Winter Session 2023 : शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा आश्वासनांचे मृगजळच..! अधिवेशनातून बळीराजाला काय मिळाले?

गडचिरोली जिल्ह्याच्या सोडे गावाजवळ मुलींची शासकीय आश्रमशाळा आहे. गडचिरोली मुख्यालयापासून सोडे हे गाव सुमारे 30 किलोमीटरवर आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना नेहमीप्रमाणे दुपारचे भोजन देण्यात आले. या जेवणामध्ये बटाटे-कोबीची भाजी, वरण आणि भात यांचा समावेश होता. भोजन झाल्याच्या सुमारे अर्धा तासाने विद्यार्थिनींना त्रास सुरू झाला. काही विद्यार्थिनींना उलट्या आणि अतिसाराचा त्रास झाला.

एकापाठोपाठ एक करीत शंभरहून अधिक विद्यार्थिनींची प्रकृती एकाच वेळी बिघडल्याने आश्रमशाळेतील शिक्षक आणि कर्मचारी घाबरले. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी या विद्यार्थिनींना आठ किलोमीटरवर असलेल्या धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Sode Ashram School
Uma Khapare : 'इंद्रायणी'च्या प्रदूषणावरून संतप्त उमा खापरेंचा सरकारला घरचा आहेर, म्हणाल्या...

ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थिनींवर उपचार सुरू असताना त्यातील 73 मुलींची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने गडचिरोलीमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या विद्यार्थिनींवर उपचार सुरू होते. त्यातील काही मुलींची प्रकृती स्थिर होत असल्याचे गडचिरोली जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

भोजनातील नेमक्या कोणत्या पदार्थामुळे ही विषबाधा झाली, याची माहिती घेतली जात आहे. हिवाळी अधिवेशनाचा बुधवारी समारोप झाला. त्यानंतर नागपुरात मुक्कामी असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी तातडीने गडचिरोलीचा रस्ता धरला. आश्रमशाळा प्रशासनाकडून धानोरा तालुक्यातील महसूल यंत्रणेने माहिती घेतली. त्यानंतर तालुक्यातील अधिकाऱ्यांनी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांना संपूर्ण माहिती दिली.

विषबाधा झालेल्यांपैकी बहुतांश विद्यार्थिनींची प्रकृती स्थिरावत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. विषबाधा झालेल्या मुलींना वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यास सध्या प्राधान्य देण्यात येत आहे. आश्रमशाळेतील घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे. याप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com