Akola Political News : गेल्या चार वर्षांपासून 'धूळ खात' पडलेल्या अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा अखेर पार पडला. लोकार्पण होऊनही अद्यापही रुग्णांच्या सेवेत न आलेल्या या हॉस्पिटलच्या श्रेयवादावरूनच आता राजकारण सुरू झाले आहे. हे हॉस्पिटल काँग्रेसमुळेच झाल्याचा दावा करण्यात आला आहे, तर भाजप या हॉस्पिटलचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात करीत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.
अकोला जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 2019 मध्ये बांधून तयार असलेल्या या भव्य इमारतीचा लोकार्पणाचा मुहूर्त चार वर्षांनंतर पार पडला असला तरी येथे डॉक्टरांअभावी 'विशेष उपचार' मात्र होणार नाहीत, असा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे या हॉस्पिटलचे श्रेय काँग्रेसचेच असल्याचा दावा जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी केला.
काँग्रेसने केले 'हे' दावे
अशोक अमानकर म्हणाले, मोदी सरकारने या रुग्णालयासाठी 120 कोटी मंजूर केल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात केला, परंतु अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या स्थापनेमागे भाजप सरकारचा कोणताही संबंध नाही. डॉ. सुधीर ढोणे यांनी 15 ऑगस्ट 2013 रोजी तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
या निवेदनात अकोल्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालय स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल स्थापनेबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश संचालक वैद्यकीय शिक्षण यांना दिले होते, तर राज्यातील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने केंद्र सरकारकडे अकोल्यात सुपर स्पेशालिटी रुग्णालय स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. केंद्रात त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. गुलाम नबी आझाद हे आरोग्यमंत्री होते. गुलाम नबी आझाद यांनी आपल्या अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यातही अकोल्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल स्थापन करणार असल्याची घोषणा केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
काँग्रेस सरकारने निधीही मंजूर केल्याचा दावा
प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यात देशातील 39 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अद्ययावतीकरण या योजनेअंतर्गत अकोल्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी आर्थिक बाबींशी संबंधित कॅबिनेट कमिटीने नोव्हेंबर 2013 मध्ये 150 कोटींचा निधी मंजूर केला. यापैकी 120 कोटी केंद्र सरकार, तर 30 कोटी राज्य सरकारचा हिस्सा होता. त्यावेळी केंद्रात व राज्यात दोन्ही ठिकाणी काँग्रेस आघाडीचेच सरकार होते. त्यामुळे हे सर्व पैसे काँग्रेसच्याच सरकारने दिल्याचे सिद्ध होत आहे. तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी डिसेंबर 2013 मध्ये लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली होती, असाही दावा अमानकर यांनी केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जानेवारी 2021 रोजी अकोल्यासह राज्यातील यवतमाळ, लातूर, औरंगाबाद या सुपर स्पेशालिटी रुग्णालयांसाठी 888 पदे मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकार्पण झाल्यानंतरच श्रेयवाद सुरू!
गेल्या चार वर्षांपासून अकोल्यातील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधून तयार होते. गेली चार वर्षे ही भव्य इमारत केवळ 'शोभेची वास्तू" बनली होती. कोरोना काळातही तिचा उपयोग करता आला नाही. पदभरती झाली नसल्याने नागरिकांना याचा कोणताच फायदा झाला नाही. मात्र आता लोकार्पण झाल्यानंतर या रुग्णालयाच्या श्रेयवादावरून कॉंग्रेस आणि भाजप मध्ये लढाई सुरू झाली आहे. जनतेला या दोघांच्याही श्रेय वादाचे काही देणेघेणे नाही. जनतेला अपेक्षा आहे. ती केवळ आरोग्य सेवेची आज जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील हजारो रुग्ण शासकीय रुग्णालयात येतात. त्याचा मोठा ताण जिल्हा सामान्य रुग्णालयावर पडला आहे. रुग्णांना चांगली आणि लवकर अत्यावश्यक सेवा मिळावी यासाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली. मात्र लोकार्पण झाल्यानंतरही हे रुग्णालय मनुष्यबळा अभावी उपचारासाठी अद्यापही खुले झाले नाही. हे सगळं असतांनाही श्रेयवादावरून राजकारण सुरू झालं आहे. श्रेय कुणीही घ्या मात्र आम्हाला हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपयोगी पडू हीच माफक अपेक्षा आता जनतेकडून केली जात आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.