नागपूर : विधानपरिषद निवडणुकीसाठी आयात केलेला उमेदवार मतदानाच्या आदल्या रात्री बदलवण्याची नामुष्की प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यामुळे कॉंग्रेसवर ओढवली. आपल्या पक्षातील मंत्र्यांच्या दबावात आल्यामुळे नाना तोंडघशी पडले. असा प्रदेशाध्यक्ष कार्यकर्त्यांना काय तोंड दाखवणार, असा तिखट सवाल भाजपचे प्रदेश सरचिटणीस व उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.
आज प्रेस क्लबमध्ये बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ऐनवेळी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर करावा लागण्याची नामुष्की काँग्रेसवर आली. यासाठी जबाबदार असलेले प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असा सल्लाही बावनकुळे यांनी पटोलेंना दिला आहे. पटोले हतबल असून काँग्रेसला ते न्याय देऊ शकत नाहीत. दोन मंत्र्यांच्या दबावात येऊन त्यांना अ. भा. काँग्रेस समितीने घेतलेला निर्णय बदलावा लागला. हे अत्यंत लाजिरवाणे चित्र असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.
महाराष्ट्र काँग्रेसच्या इतिहासातील ही वाईट घटना आहे. मंत्र्यांच्या दबावात काम करणाऱ्या हतबल प्रदेशाध्यक्षांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा वा काँग्रेसने त्यांना हटवावे, असेही ते म्हणाले. आपण यापुढे काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे छोटू भोयर (Chotu Bhoyar) यांनी आधीच जाहीर केले आहे. कोणी कोणाला कुठे पाठवत नसतो. ते स्वत:हून काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे त्यांना भाजपने पाठवले, या म्हणण्यात काही तथ्य नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
आमच्याकडे ३१८ चे बहुमत होते. त्यामुळे छोटू भोयर वा आणखी कोणी ही निवडणूक जिंकूच शकत नव्हते, अशी हमी बावनकुळेंनी दिली. ३१८ च्यावर मला मिळणारी मते महाविकास आघाडीची असतील, असेही ते म्हणाले. ४ मार्च २०२१ ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात इम्पेरिकल डेटा तयार करण्याचे काम राज्य सरकारचे असल्याचे स्पष्ट केले होते. त्यासाठी ट्रिपल टेस्टही करण्यास सांगितले होते. यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मनमोहनसिंग सरकारनेही डेटा देण्यास नकार दिला होता. त्यात ६९ लाख चुका आहे.
काँग्रेस नेते खोटे बोलून टाईमपास करीत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. आजही ४०० कोटींची मागणी असताना केवळ ५ कोटी देऊन तोंडाला पाने पुसल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. ओबीसींना न्याय द्यायचा असेल तर निवडणुका पुढे ढकलून इम्पेरिकल डेटा तयार केला पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही. नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची वाट लागणार आहे. काँग्रेसचे काही पोपट निष्कारण पोपटपंची करीत सुटले आहेत, असा आरोपही बावनकुळे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.