

ाBJP-MIM Alliance : अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत भाजप- एमआयएम युतीचा नवा राजकीय अध्याय सुरू झाला आहे. नगरपालिकेत सुरुवातीला गटनोंदणीमध्ये झालेल्या अनैसर्गिक युतीचे राज्यासह देशात पडसाद उमटले. टीका होऊ लागल्याने भाजप अन् एमआयएमने फारकत घेतली होती. पण आता भाजप अन् एमआयएमला एकमेंकाशिवाय करमेनासे झाले आहे. स्वीकृत नगरसेवक निवडीत भाजपला एमआयएमने साथ दिली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या युतीचा दुसरा अंक सुरू झाल्याची चर्चा आहे.
अकोला जिल्ह्यतील अकोट नगरपालिकांमध्ये झालेल्या भाजप-एमआयएम युतीवरून देशभरात मोठा गदारोळ उडाला. या युतीसाठी जबाबदार धरत स्थानिक आमदार प्रकाश भारसाकळे यांना भाजपने (BJP) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या सर्व घडामोडीनंतर एमआयएम भाजपच्या नेतृत्वाखालील 'अकोट विकास मंचा'तून बाहेर पडला. यानंतर एमआयएमच्या 5 नगरसेवकांनी स्वत:चा गट स्थापन केला.
पहिल्या युतीने वाद झाल्यानंतर आज परत ही युती वेगळ्या रूपात परत समोर आली आहे. आज स्वीकृत सदस्य निवडण्याच्या प्रक्रियेत परत भाजप-एमआयएमने युती झाली आहे. एमआयएमने स्वीकृत नगरसेवक पदासाठी ताज राणा यांचं नाव दिलं होतं. यासोबतच एमआयएमने भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचा मुलगा जीतेन बरेठिया यांनाही उमेदवारी दिली. यात ताज राणा यांनी वेळ निघून गेल्यावर उमेदवारी दाखल केल्याचे कारण देत त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आला नाही. यामुळे एमआयएमकडून एकमेव अर्ज आलेले, भाजपचे जीतेन बरेठिया हे आता एमआयएमचे स्वीकृत नगरसेवक असतील.
एमआयएमचे स्वीकृत नगरसेवक पदाचे उमेदवार ताज राणा कोर्टात जाण्याची तयारी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, भाजपने एमआयएमसोबत युती करण्यास कारणीभूत असलेले आमदार प्रकाश भारसाकळे आणि शहराध्यक्ष हरीश टावरी यांच्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. स्वीकृत सदस्यामुळे अकोट नगरपालिकेमध्ये भाजप-एमआयएम युतीची, परत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, यानंतर काँग्रेसने या अनैसर्गिक युतीवर पुन्हा टीकेची झोड उठवली आहे.
दरम्यान, अकोट नगरपालिकेतील सुरूवातीला झालेल्या गटनोंदणीत भाजपबरोबर एमआयएम अकोट शहर विकास मंचात सहभागी झाल्यावरून देशभरात या युतीवर खळबळ उडाली होती. भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्वतः नाराजी व्यक्त केली. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देखील याची दखल घेतली होती.
यानंतर अकोट शहराचे एमआयएमचे शहराध्यक्ष आरीफ शहाह हन्नान शाह, प्रदेश उपाध्यक्ष युसुफ मोहम्मद शफी पुंजानी यांनी एमआयएमचे 5 नगरसेवक रेश्मा परवनी मोहम्मद अजीम, युसूफ खान हादीक खान, हन्नान शाह सुलतान शाह, दिलशाद बी रज्जाक खाँ आणि अफरीन अंजुम मो. शरीफोद्दीन यांचा भाजपबरोबर असलेला शहर विकास मंचाचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे पत्र दिले. हा पाठिंबा बिनशर्त मागे घेत असल्याचे त्या पत्रात म्हटले होते. परंतु आता स्वीकृत नगरसेवक निवडीत एमआयएमची पुन्हा भाजपबरोबर असलेली युती समोर आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.