
Amitesh Kumar News : नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणून त्यांनी जेव्हा पदभार स्वीकारला, त्यापूर्वीच येथील काही गुंड ‘अंडरग्राऊंड’ झाले होते. कुठलाही गुन्हेगार जर वदला नाही, तर शेवटी त्यांची एंट्री व्हायची आणि ‘तू अभी बोल पड, नही तो इतना मारूंगा की, तेरी सात पुश्ते याद रखेगी...’ हा डायलॉग मारल्यावर गुन्हेगार पोपटासारखा बोलू लागायचा. असे नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आता पुण्याचे आयुक्त म्हणून रुजू झाले आहेत.
पुण्यात एंट्री होताच तेथील गुंडांनाही धडकी भरली. आता कोयता गॅंगचे काही खरे नाही, अशा प्रतिक्रिया उमटायला लागल्या. नागपुरातील कार्यकाळ अमितेशकुमार यांनी चांगलाच गाजवला, हे नागपूरकरांनी अनुभवले. कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत शांतता कमिटी, मोहल्ला बैठक, ज्येष्ठ नागरिक बैठक, पोलिस दीदी, महिला बैठक पोलिस स्टेशन स्तरावर आयोजित केल्या गेल्या. महिलांविरुद्धचे गुन्हे थांबवण्याच्या दृष्टिकोनातून पोलिस काका व पोलिस दीदी कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे त्यांनी केले.
नागपुरात गेल्या २० वर्षांत वार्षिक सरासरी खुनाच्या १०० घटना होत होत्या. गेल्या वर्षात त्यामध्ये ३५ टक्क्यांनी घट झाली. अमितेश कुमार यांच्या दराऱ्यामुळे हे शक्य होऊ शकले. चोरीच्या घटनांमधील ४० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ६४ आरोपींच्या विरोधात एमपीडीएची कारवाई करण्यात आली. मोक्का अंतर्गत ११० संघटित गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. मिसींग मुलांपैकी ९५ टक्के मुले शोधून काढले. ऑनलाइन जुगाराच्या प्रकरणात ३३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ड्रग्जमुक्त नागपूर करण्यासाठी २० सफारी वाहनांद्वारे ‘नारकॉप्स मोबाईल’ केले गेले.
मी नाही तर आम्ही म्हणून शहरासाठी काम केलं..
शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आयुक्त निर्णय घेतात. मात्र, त्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी उपायुक्त ते हवालदार कसोशीने करतात. त्यामुळे गुन्हेगारांवर आळा घालणे शक्य होते. शिवाय नागरिकांचाही त्यात मोलाचा वाटा असल्याने केवळ ‘मी’ म्हणून नाही तर ‘आम्ही’ म्हणून नागपूर शहरासाठी काम केले असल्याचे अमितेशकुमार यांनी नागपूरला निरोप देताना सांगितले.
तीन वर्षांपूर्वी शहरात आल्यानंतर मी बाहेरचा आहे, असे कधी वाटले नाही. येथील नागरिकांनी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी माझे आपुलकीचे नाते राहिले. ते माझे कुटुंबच आहे. त्यामुळे कुटुंबप्रमुख म्हणून त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते केले. जे काम करायचे आहे, ते प्रामाणिकपणे आणि सचोटीने करणे ही बाब नेहमी अंगीकारली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माझ्या टीमने जे केले, ते उत्कृष्ट असल्याचेही अमितेशकुमार यांनी सांगितले.
अमितेशकुमार यांनी आपली कारकिर्द कशी असेल याची चुणूक पुण्यात येताच दाखवून दिलीये. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यातल्या तब्बल २६७ गुंडांची परेड काढून त्यांना सज्जड दम दिला. यात नामचिन गुंडांच्या टोळ्या होत्या. या गुंडांनाही त्यांनी चांगलीच समज दिलीये. एकूणच यावरून अमितेशकुमार यांची पुण्यातली कारकिर्द हे शहरातल्या गुन्हेगारांच्या दृष्टीनं डोकेदुखीची ठरेल यात कुठलीही शंका नाही.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.