

Amravati MLC Election 2026: अमरावती विधान परिषदेची निवडणूक आता अत्यंत नाट्यमय वळणावर येऊन ठेपली असून, काँग्रेस पुन्हा एकदा अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख हे प्रचारातून अचानक गायब झाल्याने पक्षाची मोठी राजकीय कोंडी झाली आहे. परिस्थिती इतकी बिघडली आहे की, आता काँग्रेस नेतृत्व आज महत्त्वाची बैठक घेऊन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डाॅ.नीलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा द्यायचा का, यावर निर्णय घेणार आहे.
या साऱ्या घडामोडींमध्ये बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. बच्चू कडू यांनी काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेवर थेट बोट ठेवत, “महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात काँग्रेसची राजकीय तब्येत बिघडलेली दिसते आहे,” असा टोला लगावला.
ते पुढे म्हणाले, “राज्यात काही विधान परिषद जागा बिनविरोध झाल्या, पण एवढा मोठा पक्ष असूनही काँग्रेसला (Congress) प्रभावी उमेदवार उभा करता आला नाही. साधा उमेदवारही मिळत नाही, आणि उभा केलेल्या उमेदवारालाही रुग्णालयात दाखल व्हावं लागतं. यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती?” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर जहरी टीका केली.
बच्चू कडू यांनी काँग्रेसच्या घसरत्या राजकीय स्थितीमागे पक्षाच्या चुकीच्या रणनीती आणि निर्णयांना जबाबदार धरले. काँग्रेसच्या चुकीच्या राजकीय भूमिकांमुळे पक्षाची ही अवस्था झाली आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर ‘प्रहार’ केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेससाठी हा आणखी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
दरम्यान, काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख हे रुग्णालयातून डिस्चार्ज झाले असले तरी त्यांनी अद्याप निवडणुकीत सक्रिय भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे पक्षात अस्वस्थता वाढली असून, आज होणाऱ्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डाॅ. नीलेश विश्वकर्मा यांना अधिकृत पाठिंबा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय वर्तुळात सध्या सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे, जर काँग्रेसने वंचितला पाठिंबा दिलाच, तर अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख यांची पुढची भूमिका काय असणार? कारण निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेस पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. पक्षाने प्रचारासाठी एकही मोठी सभा घेतलेली नाही, जिल्ह्याबाहेरील एकही बडा नेता प्रचारासाठी मैदानात उतरलेला नाही आणि उमेदवार स्वतः आजारी असल्याने घरीच राहून डिजिटल प्रचाराचा दावा करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर अमरावतीतील काँग्रेस नगरसेवकांची मोठ्या प्रमाणावर मतफूट होऊन त्याचा थेट फायदा भाजप उमेदवाराला होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा रंगू लागली आहे. अमरावतीच्या या निवडणुकीत काँग्रेसची पडझड आणखी स्पष्ट होणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, अमरावती विधान परिषद निवडणूक ही आता फक्त एका जागेची निवडणूक राहिलेली नसून, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीची मोठी परीक्षा ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.