नागपूर : आरोग्य विभागाच्यावतीने काल रविवारी गट ड संवर्गातील विविध पदांकरिता राज्यभर परीक्षा घेण्यात आल्या. नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय केंद्रावर दोन विद्यार्थ्यांना एकाच रोल नंबरवर परीक्षा द्यावी लागली. त्यानंतर संतोष फड या विद्यार्थ्याने आरोग्य विभाग आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला. तसा व्हिडिओदेखील संतोषने सोशल मिडियावर टाकला आहे. मला मिळणार असलेली नोकरी हिसकण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आणि राजेश टोपे यांनी मला नोकरी द्यावी, अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संतोष फड याने केली आहे.
चीड आणणारी गोष्ट म्हणजे संतोष रमेश फड हा दिव्यांग आहे. तो नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील टाकळी गावाचा रहिवासी आहे. त्याला परीक्षेसाठी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय हे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. याच केंद्रावर गैरप्रकार घडला आहे. आरोग्यमंत्र्यांना या खात्याचा कारभार सांभाळता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही या संतोषने केली आहे. परीक्षांचे नियोजन जमत नसेल, परीक्षा घेता येत नसतील तर घेता कशाला, असा प्रश्न करीत संतोष फड म्हणाला, काल झालेल्या परीक्षेत माझा आणि आणखी एका विद्यार्थ्याचा रोल नंबर एकच होता. एकाच रोल नंबरवर दोघांनी परीक्षा दिली. या प्रकाराचा आम्हाला फार मानसिक त्रास झाला आहे. आरोग्य मंत्र्यांनी यापूर्वी गट क संवर्गाच्या परीक्षा घेतल्या, त्याचा पेपर फुटला होता. तेव्हा मी मुंबईच्या केंद्रावर परीक्षा दिली होती आणि पेपर आरोग्य विभागानेच फोडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.
परीक्षेसाठी अर्ज सादर करताना परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. त्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. मग पुन्हा परीक्षा घेतली. त्यानंतर परीक्षा केंद्र विभागांनुसार देण्यात आले. परीक्षेसाठी आम्ही आमच्या खिशातून पैसे भरले आहेत. जर आम्हाला परीक्षा केंद्र निवडायची मुभा दिली, तर मग आमचे केंद्र बाहेरचे का देण्यात आले. आम्ही गरीब शेतकऱ्यांची मुलं आहोत. आमचे आईवडील काबाडकष्ट करून आम्हाला शिक्षणासाठी पैसे लावतात. आज परीक्षा फी, नादेडवरून येण्याजाण्याचेही पैसे माझ्याकडं नव्हते. उसने पैसे घेऊन मी नागपुरात परीक्षा द्यायला आलो, तर येथे एकाच रोल नंबरवर दोन विद्यार्थी परीक्षा देत असल्याचा तमाशा दिसल्याचे संतप्त झालेल्या संतोष फड याने ‘सरकारनामा’ला सांगितले.
नागपुरात राहण्याची सोय नसल्यामुळे मी रात्रभर ८-९ तासांचा प्रवास करून गावाहून येथे आलो. सकाळी परीक्षा द्यायला केंद्रावर गेलो असता घडलेला प्रकार बघून मला धक्काच बसला. तेथील प्राध्यापकांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला असता, त्यांनी एकाच रोल नंबरवर दोघांनीही परीक्षा द्या, असे सांगितले. पण मार्क कुणाचे ग्राह्य धरणार आणि निकाल कसा लागणार, याचे उत्तर मात्र ते देऊ शकले नाहीत. ज्या परीक्षेसाठी मी दोन वर्ष कष्ट उपसले आणि आरोग्य विभागाकडून असा खेळ चाललेला बघून मानसिक खच्चीकरण झाले. त्यामुळे मी पेपर व्यवस्थित सोडवू शकलो नाही. मला मिळणारी नोकरी हिसकण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मला नोकरी द्यावी, अन्यथा आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संतोष फड याने केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.