नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संबंधीची तक्रार एकेकाळच्या पोलिस अधिकाऱ्याने केली. आज त्या तक्रारीवरून अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. ज्यांनी तक्रार केली, त्यांच्याही चौकश्या सुरू आहेत. अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकल्यानंतर जो काही कालावधी झाला. यामध्ये चौकशी ही कशा पद्धतीने आणि किती काळ केली जाते आणि ती सत्तेचा गैरवापर करून कशी केली जाते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अनिल देशमुख आहेत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.
यासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, माझ्याकडे माहिती अशी आहे की, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे कुटुंब, नातेवाईक, सहकारी कर्मचारी, त्यांचे स्वीय साहाय्यक, सीए अशा जवळपास ९५ लोकांवर छापे टाकले गेले. किमान २०० लोकांची चौकशी झाली. यामध्ये जी छापामार कारवाई केली गेली. ईडीचे (ED) ५०, सीबीआयचे (CBI) २०, आयकर विभागाचे २० छापे, असे जवळपास ९० छापे एका व्यक्तीच्या संबंधाने टाकले गेले. प्रशासनामध्ये असे कधीच ऐकिवात किंवा बघण्यात आले नाही की, एकाच व्यक्तीच्या संबंधात वेगवेगळ्या विभागाचे ९० छापे टाकण्यात आले. पण यावेळी ते बघायला मिळाले.
अनिल देशमुखांबाबत जो आरोप करण्यात आला तो १०० कोटींचा करण्यात आला. १०० कोटींवरून ७ कोटी आणि त्यानंतर आता ते लोक ७० लाख रुपयांवर आले आहेत. चार्जशीट पाहिली असता असे लक्षात येते की १ कोटी ७० लाख रुपयांचा उल्लेख केलेला आहे. दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीतील चौकशीमधील ही प्रगती तपास यंत्रणांची आहे. अशा चौकशीची एखादी मोठी बातमी येते आणि लोकांच्या मनात तेच बसते. एखाद्याला अशा पद्धतीने बदनाम करणे आणि जनमानसात त्याची प्रतिमा मलिन करणे, असेच काम या लोकांचे आहे, हे आता जनतेच्या लक्षात आलेले असल्याचेही पवार म्हणाले.
येवढे छापे टाकूनही काही साध्य झाले नाही, तर त्यानंतर अजून कसा त्रास देता येईल, याचे प्रयत्न विरोधी पक्षाकडून केले जात आहेत. मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्राची सत्ता हातातून गेल्यामुळे केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून शासन अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला यश येत नाही, त्यामुळे ही टोकाची भूमिका घेतली असावी, असे म्हणत शरद पवार यांनी फडणविसांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर कशा पद्धतीने केला जात आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. राज्य सरकार या प्रकरणाच्या खोलात जाईल आणि सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करेल आणि वास्तव स्थिती काय आहे, हे येणाऱ्या काळात जनसामान्यासमोर मांडेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.