Anil Sole: माजी आमदार अनिल सोलेंना मिळालेले पुरस्कार भंगारात; ५०, १०० रुपयांत विक्री..

Former Mayor News : प्रा. अनिल सोलेंना दिलेल्या सन्मान आणि पुरस्काराचा कचरा झाला आहे.
Former Mayor Of Nagpur
Former Mayor Of NagpurSarkarnama

Former Mayor Anil Sole : नागपूर (Nagpur) शहराचे माजी महापौर, (Mayor) माजी आमदार, शिक्षक सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांना आजवर मिळालेले विविध पुरस्कार व सन्मानचिन्ह आज चक्क भंगार विक्रेत्याकडे आढळले. तेथे भंगारवाला ५० ते १०० रुपयांत या पुरस्कारांची विक्री करताना आढळला. माजी आमदारांना मिळालेले पुरस्कार विकत घेण्यासाठी काही लोकांनी तेथे गर्दी केली होती. हा प्रकार धक्कादायक असल्याचे उपस्थित लोकांनी `सरकारनामा'ला सांगितले.

सन्मानाचा ‘कचरा’

माजी आमदार, शिक्षक सहकारी बॅंकेचे (Bank) अध्यक्ष अनिल सोले यांना विविध संघटना, विद्यापीठांनी दिलेल्या सन्मान आणि पुरस्काराचा कचरा झाला आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कार भंगारच्या दुकानामध्ये विकण्यात आले. त्या पुरस्काराची विक्री ५० ते १०० रुपयांत केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे सन्मानाचा ‘कचरा’ केल्याचे बोलले जात आहे. अनिल सोले हे नागपूर विधान परिषदेचे पदवीधर मतदार संघाचे आमदार होते. त्या काळात त्यांना अनेक आघाडीच्या आणि ते ज्या विचाराशी संलग्नित आहेत, त्या संस्थांनी सत्कार केल्यानंतर पुरस्कार अथवा सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.

स्वीय सहायकाची धावाधाव..

प्रा. सोलेंना मिळालेल्या पुरस्कार अथवा सन्‍मानामध्ये गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या सन्मान चिन्हासह आमदार बंटी भागडीया यांनी आयोजित केलेल्या शहीद स्मृती दिनाच्या कार्यक्रमातील सन्‍मान चिन्ह, लोकमान्य सांस्कृतिक क्रीडा मंडळ रेशीमबागने दिलेले भारत मातेच्या छायाचित्राचे स्मृति चिन्ह, विदर्भ हिंदी साहित्य संघाचा प्रेरणा पुंज सन्मान, सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्हही रामदास पेठ येथील फुटपाथवर भंगारात पडलेले होते. सोले यांना मिळालेले पुरस्कार भंगारच्या दुकानात असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक विजय फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयात मिळाली.

Former Mayor Of Nagpur
जोशी, सोले बैठकीला का आले नाही? भाजपमधील धुसफुस वाढली..

विकलेल्या पुरस्कारांचे काय?

माहिती मिळताच तातडीने ते रामदास पेठ येथील भंगारवाल्याकडे आले. त्याच्याकडून सर्वच पुरस्कार परत मागितले. त्यावेळी सोले यांच्या कार्यालयाचे स्थलांतर करण्यात येत आहे. त्यामुळे हे पुरस्कार एका पोत्यात भरून ठेवलेले होते. कर्मचाऱ्यांना रद्दी विकण्यासाठी सांगितले. परंतु त्यांनी रद्दी समजून पुरस्काराचे पोतेही येथे आणले असावे. आम्ही नवीन कार्यालयात पुरस्कार ठेवण्यासाठी ते पोते शोधत होतो. तेवढ्यात पुरस्कार रद्दी विक्रेत्याकडे असल्याची माहिती मिळाली. तातडीने येथे पोहोचलो आणि सर्वच पुरस्कार परत घेतले. मात्र, या नाट्याच्या मधात काही पुरस्कार अज्ञात व्यक्तींनी ५० आणि १०० रुपयांत विकत घेतले. त्याचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com