Amaravati Political News : युवा स्वाभिमानी पक्षाच्या महिला नेत्या, अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि काँग्रेसच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्यात निवडणूक काळात पैसे देण्या-घेण्याच्या कारणांवरून सध्या चांगलेच शाब्दिक युद्ध सुरू आहे. (From MLA Ravi Rana. Adv.Thakur took strict notes)
खासदार राणा यांनी सुरू केलेला हा राजकीय संघर्ष अब्रूनुकसानीच्या दावा करीत कोर्टापर्यंत नेण्याची तयारी ॲड. ठाकूर यांनी चालविली आहे. अशात या दोन महिलांच्या वादावर ‘प्रहार’ केलाय तो आमदार बच्चू कडू यांनी.
आमदार रवी राणांकडून (Ravi Rana) ॲड. ठाकूर यांनी कडक नोट घेतल्या, पण लोकसभा निवडणुकीत प्रचार दुसऱ्याचाच केला, असा थेट आरोप खासदार नवनीत राणा (Navnit Rana) यांनी केला. यावर राणा दाम्पत्याने निवडणूक काळात पैसे वाटल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे..
परिणामी निवडणूक आयोगाने त्यांची चौकशी करावी, अशी मागणी ॲड. ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केली आहे. यासंदर्भात प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी खासदार राणा व आमदार ठाकूर या दोघांचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
‘कुणी किती पैसे दिले व कुणी किती पैसे घेतले, हे जनतेसमोर आलं पाहिजे’, असं आमदार कडू म्हणाले. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत जर असे काही झाले असेल तर मुळात हे चुकीचे आहे. सर्वप्रथम अशा प्रकारे पैसे देणारा चुकीचा आहे, असे आमदार कडू म्हणाले.
यासंदर्भात पोलिस आयुक्तांकडे आपण तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी गरजेची झाली आहे. केवळ आरोप-प्रत्यारोपांनी काहीही सिद्ध होणार नाही, असे कडू म्हणाले.
नवनीत राणा आणि ॲड. यशोमती ठाकूर यांच्यातील हा राजकीय वाद दिवसेंदिवस वाढत आहे. चोर, गोरी चमडी, औकात, बाप काढण्यापर्यंत हा वाद वाढला आहे. अशात आमदार बच्चू कडू यांनीही या वादात उडी घेतली आहे.
अमरावती जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याचा प्रकार नवा नाही. माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार अभिजित अडसूळ आणि राणा दाम्पत्य यांच्यातील राजकीय वाद तर कोर्टापर्यंत गेला आहे.
आमदार सुलभा खोडके व आमदार रवी राणा यांच्यातील मतभेदही सर्वश्रुत आहेत. अलीकडेच आमदार बच्चू कडू व आमदार राणा यांच्यात कलगीतुरा रंगला होता. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली होती. या वादाच्या मालिकेत आता आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांचीही भर पडली आहे
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.