

Mahayuti Internal Conflict : अमरावतीच्या राजकारणातून सुरू झालेल्या बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यातील संघर्षाने आता महायुतीच्या राजकारणात नवे वळण घेतले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना अप्रत्यक्षपणे शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिल्यानंतर विदर्भातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली सावध प्रतिक्रिया अनेक राजकीय संकेत देणारी ठरत आहे.
गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू हे भाजप (BJP) आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळे महायुतीतील समन्वय आणि अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. कडू यांच्या वक्तव्यांना भाजपकडून वारंवार प्रत्युत्तर दिले जात असल्याने महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
बच्चू कडू यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याबाबत बोलताना, चांगली व्यक्तिमत्त्वे सोबत घ्यायलाच हवीत. नवनीत राणा शिवसेनेत आल्या तर आम्ही दोन पावले मागे घेऊ, असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानाकडे केवळ राजकीय टोला म्हणून नव्हे, तर शिंदे सेनेकडून दिलेले खुले आमंत्रण म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत असताना कडू यांनी घेतलेली ही भूमिका अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी भूमिका बच्चू कडू यांनी अनेकदा जाहीरपणे मांडली आहे. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडूंना अप्रत्यक्षपणे सुनावले. महायुतीला 51 टक्के बहुमत मिळाले आहे. राज्यात मजबूत सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला विकसित राज्य बनवण्याचा संकल्प केला आहे. फडणवीस दिल्लीला जावेत की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत गावोगावी खडे फोडत भूमिका मांडू नयेत, असे बावनकुळे म्हणाले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटू शकते, मात्र अशा भूमिका पक्षनेतृत्वाशी चर्चा करूनच मांडल्या पाहिजेत.
बावनकुळे यांनी महायुतीच्या समन्वय समितीचाही उल्लेख करत महत्त्वाचे विधान केले. काही भूमिका या पक्षनेत्यांना विचारूनच मांडायच्या असतात. समन्वय समितीत याबाबत ठरलेले आहे. कोणी ते पाळत नसेल तर त्यावर चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले. या विधानामुळे महायुतीतील काही नेते समन्वय समितीच्या निर्णयांचे पालन करत नसल्याचे संकेत मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची राजकीय चर्चा आणखी रंगण्याची शक्यता आहे.
नवनीत राणा यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर बोलताना बावनकुळे यांनी अत्यंत मोजकी पण महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. नवनीत राणा या भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत निष्ठावान कार्यकर्त्या आहेत. त्या कधीही भाजप सोडून जाणार नाहीत. त्या हिंदुत्ववादी विचारांच्या नेत्या आहेत. त्यांच्या बाबतीत कोणताही संभ्रम निर्माण करण्याचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले.
पुढे त्यांनी राणांच्या राजकीय भवितव्याबाबतही सूचक संकेत दिले. एक निवडणूक हरली म्हणून सर्व काही संपत नाही. आजही आम्ही त्यांना खासदारच मानतो. त्या काही मतांनी पराभूत झाल्या आहेत. त्या पुन्हा निवडून येतील. योग्य वेळी पक्ष त्यांच्या राजकीय भवितव्याचा विचार करेल, असे बावनकुळे म्हणाले.
बच्चू कडूंचे नवनीत राणांना दिलेले आमंत्रण, शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची उघड भूमिका आणि त्यावर भाजपकडून आलेली प्रतिक्रिया यामुळे विदर्भातील राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. नवनीत राणांबाबत भाजपने दाखवलेला विश्वास आणि 'योग्य वेळी विचार करू', हा संदेश आगामी राजकीय घडामोडींचे संकेत मानला जात आहे. त्यामुळे बच्चू कडूंच्या एका वक्तव्याने महायुतीतील अंतर्गत समीकरणे पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.