अकोला : राज्याचे शिक्षण राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वातातील प्रहार जनशक्ती पक्षाने प्रथमच अकोला जिल्हा परिषद निवडणुकीत थेट सहभाग घेतला आहे. पक्षाच्या चिन्हावर नसले तरी शिवसेनेच्या नावाने हा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. पालकमंत्र्यांची अकोला जिल्ह्यातील ही ‘ओपनिंग’ चांगलीच लक्षवेधी ठरणार, असं दिसतंय.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यात उद्या ५ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेतील सत्ता टिकविण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अनुपस्थितीत वंचित बहुजन आघाडीला अग्निपरीक्षेस सामोरे जावे लागत आहे. या परीक्षेचा निकाल बुधवारी ६ ऑक्टोबरला लागणार आहे.
ओबीसी सदस्यांची पदं रिक्त झाल्यामुळे अकोला जिल्हा परिषदेच्या १४ जागा व पंचायत समितीच्या २८ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेतील वंचित बहुजन आघाडीची सत्ताच पणाला लागली आहे. काठावरच्या बहुमताने सत्तेत आलेल्या वंचित बहुजन आघाडीला ओबीसी सदस्यांचे पद रद्द झाल्याचा सर्वाधिक फटका बसला होता. त्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊ शकले नाही. त्यांच्या अनुपस्थितीत स्थानिक नेत्यांना किल्ला लढविताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आणि विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचा सामना करावा लागला.
आमदार मिटकरींसमोर मोठे आव्हान...
राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील तीन घटक पक्षांपैकी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व प्रहार जनशक्ती पक्षाने एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती, तर काँग्रेसने एकला चलोचा नारा दिला. या पोट निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील तिन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आमदार रणधीर सावरकर यांनी एकहाती किल्ला लढविला तर शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या मदतीला शेवटच्या टप्प्यात खासदार अरविंद सावंत यांनी प्रचारामध्ये उडी घेतली होती. आमदार अमोल मिटकरी यांच्या गृह ग्रामातच निवडणुकीचा फड रंगला आहे. येथे येऊन ‘दादापेक्षा नाना मोठा’, असे म्हणत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी आव्हान दिल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.