Bhandara Corruption News : भंडाऱ्यातील बंद झालेल्या युनिवर्सल फेरो अँड अलाईड केमिकल्स कंपनीतील कंपनी चेअरमन इतर संचालक मंडळाच्या कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण मंत्रालयात पोहोचले आहे. माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या भ्रष्टाचाराचा पाढा त्यांच्यापुढे मांडला. त्यामुळे लवकरच या कंपनीच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरापासून 8 किमी अंतरावर असलेले मानेकनगर (खंबाटा) येथे युनिवर्सल फेरो अँड अलाईड केमिकल्स लि. हा कारखाना आहे. सन 1960 च्या दशकात या कारखान्याची स्थापना करण्यात आलेली होती. भंडारा जिल्ह्यातील हा पहिलाच उद्योग होता. या उद्योगांच्या माध्यमातून सुमारे 3 हजार कामगारांना रोजगार मिळाला होता. या कारखान्यात मॅँगनीज शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया व्हायची. नँशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन (NTPC) सोबत या कंपनीने करार केला होता.
या कराराअंतर्गत सवलतीच्या दरात या कंपनीला वीज मिळत होती. एनटीपीसीने या कंपनीशी करार करताना या कंपनीमध्ये होणारे उत्पादन केवळ देशातील पोलाद प्रकल्पांना देणे बंधनकारक होते. परंतु कंपनीने या अटीचा भंग करीत नियमबाह्यरीत्या हे उत्पादन विदेशातील अनेक कंपन्यांना विकले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर एनटीपीसीने सवलतीत वीज देणे बंद केले. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून वीज घेणे सुरू केले. परंतु विजेचे हे दर कंपनीला परवडत नसल्यामुळे तसेच त्याचवेळी कंपनीमध्ये भ्रष्टाचाराची विविध प्रकरणे समोर आल्यामुळे ही कंपनी बंद पडली.
मागील 20 वर्षांपासून बंद अवस्थेत असल्यानंतरही या कारखाना प्रशासनाने शासनाची दिशाभूल झाली. कंपनी कागदोपत्री बंद झाली असली तरीदेखील नंतरच्या काळात कंपनीकडून मॅँगनीज विकण्यात येत आहे. अद्यापही हा प्रकार सातत्याने सुरू आहे. कंपनीच्या मालकाने आत्तापर्यंत जवळपास 200 कोटी रुपयांचे रॉ मटेरियल विकलेले आहे. दरम्यान काळात 2014 मध्ये आजारी उद्योगांचे कारण सांगून कंपनीने दिल्ली औद्योगिक न्यायालयाकडून 200 कोटी रुपयांचे वीज बिल माफ करून घेतले.
या कंपनीत अजूनही 50 कोटी रुपयांचा माल शिल्लक आहे. शासकीय नियमाप्रमाणे कंपनी 10 वर्षापेक्षा जास्त काळ बंद असल्यास ती जागा शेतकऱ्यांना परत करणे बंधनकारक आहे. परंतु असे न करता कंपनी त्या 200 एकरावरील जागेत इजराईल पद्धतीने शेती करत आहेत, असे निदर्शनास आलेले आहे. वीज बिल माफ केल्यानंतरही कंपनीच्या मालकांनी कंपनी सुरू केली नाही. त्यामुळे कंपनीमध्ये काम करणारे 3 हजार कर्मचारी बेरोजगार झालेले असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या विषयाकडे गांभीर्याने लक्ष वेधून डॉ. परिणय फुके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे. या कंपनीचे चेअरमन आणि इतर संचालक मंडळावर कठोर कारवाई झाली पाहिजे. कंपनी पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कंपनीकडून भरून द्यावे तसेच नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई कंपनीकडून द्यावी, या मुद्द्यांवर डॉ. फुके ठाम आहेत. यावर त्वरित कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे डॉ. परिणय फुके यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.