Bhandara-Gondia Constituency : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम जसजसा जवळ येत आहे, तसतशी आता उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. 1980 ते 2009 सलग चारदा खासदार देणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून आता पुन्हा एकदा तिकिटासाठी पोवार समाजाने आपला आवाज बुलंद केला आहे. निवडणुकीत विजय हवा, तर पोवार समाजाला उमेदवारी द्या, असा इशाराच दिल्यामुळे सर्व पक्षांकडून विचारमंथन सुरू झाले आहे.
कोणत्या पक्षाकडून पोवार समाजाला तिकीट दिली जाणार, याकडे लक्ष वेधले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघात तब्बल 3 लाख 50 हजार मतदार असलेल्या पोवार समाजाने निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत पोवार समाजाचा उमेदवार देण्याची मागणी समाजबांधवांनी केली आहे.
गोंदिया-भंडारा लोकसभेची जागा महाविकास आघाडीतून काँग्रेसकडे, तर महायुतीकडून भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे. गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने पोवार समाज आहे. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून पोवार समाजाचा उमेदवार देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीत पोवार समाजाला उमेदवारी देण्यात आली नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पोवार समाजबांधवांनी नाराजी व्यक्त करीत 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये आमचाच उमेदवार हवा, अशी मागणी केली. तर दुसरीकडे 14 फेब्रुवारीला झालेल्या राजाभोज यांच्या जयंतीनिमित्त महारॅली काढून पोवार समाजबांधवांनी शक्तिप्रदर्शनही केले. त्यामुळे आता आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत कोणता राष्ट्रीय पक्ष पोवार समाजाच्या प्रतिनिधीला निवडणूक लढण्यासाठी संधी देणार? याकडे पोवार समाजाचे लक्ष लागले आहे.
भंडारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे मिळून एक लोकसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात कायम भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामना रंगतो. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र, आता विविध पक्षांमध्येच उभी फूट पडली. महाविकास आघाडी आणि महायुती असे समीकरण झाले. प्रफुल पटेल राज्यसभेवर गेल्यामुळे महायुतीकडून ही जागा भाजपला जाईल, हे जवळपास निश्चित झाले आहे.
विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनीही तिकिटावर दावा केला, तर दुसरीकडे माजी राज्यमंत्री परिणय फुके यांनीही प्रचाराला धडाक्यात सुरुवात केली आहे. आधीच पक्षांतर्गत वाद असताना पुन्हा पोवार समाजानेही निर्वाणीचा इशारा दिला तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे नाना पटोले यांच्याशिवाय दुसरा पर्याय सध्यातरी शिल्लक राहिलेला दिसत नाही. त्यामुळे ऐनवेळी महायुतीत नाराज पोवार नेत्याला तिकीट देऊन महाआघाडी नवा पर्याय शोधू शकते, असेही बोलले जात आहे.
पोवार समाजाचे प्राबल्य पाहता शिशुपाल पटलेंना २००९ ला भाजपने उमेदवारी दिली होती, तेव्हा ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यानंतर २०१४ मध्ये नाना पटोले यांना भाजपने उमेदवारी दिली होती. ते कुणबी समाजाचे आहेत. नाना पटोले तेव्हा निवडून आले होते. त्यानंतर २०१८मध्ये पोटनिवडणूक झाली होती. तेव्हा भाजपकडून पुन्हा पोवार समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले. पोवार समाजाचे हेमंत पटले यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हाही पोवार समाजाचे पटले यांचा पराभव झाला. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे निवडून आले होते.
२०१९मध्ये भाजपने कुणबी असलेले सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी ते निवडून आले. त्यामुळे या वेळी २०२४ मध्ये भाजप कुणबी समाजातील नेत्यालाच तिकीट देणार, हे निश्चित मानले जात आहे. राहिला पोवार समाजाचा प्रश्न तर त्यांना भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या नजीक असलेल्या बालाघाट लोकसभा मतदारसंघात संधी दिली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.