

Vidyadhar Mahale complaint : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव तथा भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
उदयनगरचे माजी सरपंच मनोज लाहुडकर यांच्यापाठोपाठ बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाने तक्रारीची गंभीर दखल घेत, जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचा आदेश देत, अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
विद्याधर महाले हे चिखली विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती असून, प्रशासकीय सेवेत आहे. तसेच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे खासगी सचिव आहेत. सरकारी सेवेत असताना, आचारसंहितेच्या काळात उघडपणे भाजपचा प्रचार करत आहेत, ही अत्यंत गंभीर, गैरकायदेशीर व लोकशाहीविरोधी बाब असल्याची तक्रार, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
काही दिवसांपूर्वी चिखली इथं भाजपच्यावतीने (BJP) दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात, त्यांनी सरकारी कर्मचारी असूनही राजकीय स्टेजवर उपस्थिती लावली. राजकीय कार्यक्रमाच्या पोस्टरवर त्यांचे फोटो झळकले, तसेच तेथून थेट भाजपला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केल्याचे राहुल बोंद्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
याहून महत्त्वाचे म्हणजे, सरकारी कर्मचाऱ्यांना कोणताही राजकीय हस्तक्षेप करणे, कायद्याने पूर्णपणे प्रतिबंधित आहे. सरकारी कर्मचारी हे जनतेची सेवा करण्यासाठी असतात, कोणत्याही पक्षाचा प्रचार करण्यासाठी नाहीत. अशा प्रकारे पदाचा, सरकारी कार्यालयाचा व अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेचा वापर राजकीय फायद्यासाठी करणे हा निवडणूक आचारसंहितेचा स्पष्ट भंग आणि लोकशाही मूल्यांवरील आक्रमण आहे, असा गंभीर आरोप राहुल बोंद्रे यांनी केला आहे.
विशेषतः विद्याधर महाले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव, या जबाबदारीच्या पदावर कार्यरत असल्याने, त्यांच्याकडून, असा राजकीय हस्तक्षेप होणे अत्यंत अनुचित व चिंताजनक आहे, असे राहुल बोंद्रे यांनी तक्रारीत म्हणत निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले आहे. याशिवाय चिखली नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले काँग्रेसचे काशिनाथ बोंद्रे यांनीही अशाच प्रकारची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.
निवडणूक आयोगाने देखील या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी काय अहवाल देतात अन् त्या अहवालावर निवडणूक आयोग काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.