Politics in Bhandara on Mineral Wealth : भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी क्षेत्र नैसर्गिक तसेच खनिज संपत्तीनं समृद्ध आहे. ही नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबडण्याचं काम सर्रासपणे केलंय. त्याची भरपाई करण्याच्या नावावर प्रशासनानं केवळ वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. कोट्यवधींचा महसूल देण्याची क्षमता असूनही पर्यावरणाच्या हानीची भरपाई करण्यासाठी उपाययोजना व नियोजनशून्य असल्याचा आरोप भाजप तुमसर विधानसभा प्रमुख तथा तुमसरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी केला आहे. आपल्या आरोपांतून त्यांनी भूमाफियांवर तोशेरे ओढलेत.
तुमसर विधानसभा क्षेत्र नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीत सधन आहे. नदी, तलाव, जंगल, खनिज अशी समृद्धता तुमसर-मोहाडी दोन्ही तालुक्यांना लाभली आहे. मात्र, सरकारच्या पर्यावरणपूरक योजनांची याच भागात उपेक्षा होत आहे. त्याकडं प्रशासनाची डोळेझाक सुरू आहे. या भागातील नद्यांमधून बेकायदेशीरपणे वाळूउपसा सुरू आहे. टेकड्यांतून मुरूम उत्खनन करण्यात येत आहे, परवानगी न घेता वृक्षतोड होत आहे. निसर्गाचा हा ऱ्हास तुमसर-मोहाडी तालुक्यांत शिगेला पोहोचला आहे, असा आराेप पडोळेंनी केलाय. (BJP Leader Pradeep Padole from Tumsar of Bhandara District gets angry for Environmental Degradation in area)
निसर्गाच्या या ऱ्हासाकडं प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं भविष्यात येणाऱ्या पिढीला यातून अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल. भूस्खलनामुळे आधीच नदीकाठावरील शेतजमिनीचे क्षेत्रफळ घटत चाललं आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास वातावरणात बदल, तापमान वाढ, पर्यावरण असंतुलन, महापूर असे परिणाम भंडाऱ्यातील स्थानिकांनाच भोगावे लागतील, असा इशारा पडोळे यांनी दिला आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता जैवविविधता टिकून राहावी, याकरिता एमपीसीबी कायदा राज्य सरकारनं अमलात आणलाय खरा, मात्र उद्योगधंद्यांनापूरक ना हरकत प्रमाणपत्रं, खनन, उत्खनन याच्या प्रमाणात तुमसर-मोहाडी तालुक्यांतील पर्यावरण समतोलाचा आलेख मागील काही काळात ढासळला आहे. तशी आकडेवारीदेखील आहे. एमपीसीबी, खाण व खनिज अधिनियम कायदा जिल्ह्यात हद्दपार ठरला आहे, असं पडोळे यांचं म्हणणं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जिल्हा प्रशासनानं कोणतं कर्तव्य निभावले आणि कारवाई केली याबाबत प्रशासकीय संकेतस्थळावरील अधिकृत माहितीदेखील गायब आहे. त्यामुळं पडोळे यांनी जिल्हा प्रशासनाला धारेवर धरलं आहे. संबंधित विभागाकडं त्यांनी तक्रारही केली आहे. तुमसर-मोहाडी क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत वन विभाग, सामाजिक वनीकरण, स्थानिक प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबवित वृक्ष लागवड करण्यात आली. मात्र, संगोपन, संवर्धनाकडं दुर्लक्ष झालं. त्यामुळं किती झाडं जगली, असा प्रश्न आहे. या सर्व कामांचं स्वतंत्र ऑडिटच गरजेचं असल्याचं पडोळे यांनी नमूद केलं आहे.
(Edited By : Prasannaa Jakate)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.