Bhandara District Political News : रावणदहनाची गेल्या अनेक शतकांची परंपरा आहे. धनुष्याची प्रत्यंचा ओढून आगीची ज्वाला रावणाच्या पुतळ्यावरती सोडण्यात येते व त्यातून रावणदहन करण्यात येते. परंतु, अलीकडच्या काळामध्ये आदिवासी समाजाने रावणदहन करू नये, अशी मागणी केली. ही मागणी होताच भंडारा जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याने घाईने पत्र काढले. (As soon as the demand was made, an officer of Bhandara district hastily took out the letter)
रावणदहनासाठी सोडला जाणारा "बाण" आता या पलटून ‘त्या’ अधिकाऱ्यावर उलटण्याची चिन्हे दिसत आहेत.अशा पद्धतीचे पत्र काढणाऱ्या अधिकाऱ्यावर शरसंधान साधण्यासाठी अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर (शिंदे गटाचे) यांनी आपल्या धनुष्याची प्रत्यंचा ओढली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भंडारा शहरात शास्त्रीनगरच्या दसरा मैदानात हिंदवी प्रतिष्ठान व पंजाबी युवक मंडळातर्फे विजयादशमी व रावणदहनाचा कार्यक्रम हजारोंच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला आमदार नरेंद्र भोंडेकरही उपस्थित होते. दरम्यान, रावणदहनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काढलेल्या पत्रावरही भोंडेकर यांनी आक्षेप घेतला. रावणदहन हा सनातन धर्मातील एक महत्त्वाचा उत्सव आहे.
रावणदहन म्हणजे वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय मानला जातो. म्हणून याला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. रावणदहन याचा अर्थ रावणाला जाळणे नव्हे. कारण रावणाला कुणी बघितले नाही. जळतो तो रावण नसून, रावणाची प्रतिकृती आहे. समाजातील वाईट गोष्टी नष्ट करणे, हा त्यामागील हेतू आहे, असे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.
दरम्यान, प्रशासनाने पत्र काढून रावणदहन केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शंका वर्तविली, जे की निंदनीय आहे आणि सनातन धर्माच्या सणांवर प्रश्नचिन्हे लावणाऱ्या अधिकाऱ्याला जिल्ह्यात टिकू देणार नसल्याची चेतावणी आमदार भोंडेकर यांनी दिली.
एवढीशी गोष्ट एखाद्या अधिकाऱ्याला कळत नसेल, तर तो अधिकारी होण्याच्या लायकीचा नाही, असे अधिकारी आमच्या उत्सवाला थांबविण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्याला जिल्ह्यात राहण्याचा अधिकार नाही, असा इशारा आमदार भोंडेकरांनी दिला आहे. दरम्यान, या उत्सवाला जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर नेण्याचे आश्वासन आमदार भोंडेकर यांनी दिले.
भोंडेकर-मिटकरी येणार आमनेसामने?
दरम्यान, रावनदहनावरून सत्तापक्षाचे दोन आमदार एकमेकांना भिडणार आहेत. रावनदहनावरून भंडाऱ्याचे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि अकोल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आमनेसामने येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अमोल मिटकरी यांनी आदिवासी समाजाच्या मागणीचे समर्थन केले आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात आपण आदिवासी समाजाची ही मागणी रेटून धरू, हेसुद्धा त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे सभागृहात त्यांचा सामना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी तयारी हिवाळी अधिवेशनापूर्वी भोंडेकरांना करावी लागणार आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.