Chandrapur Lok Sabha Election : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ नेहमी निर्णायक ठरला आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणारे उमेदवार विजयी ठरल्याचा या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आहे. याचा प्रत्यय मागच्या निवडणुकीतही आला. 25 हजार 744 मतांचे मताधिक्य घेत दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा पराभव केला. चंद्रपुरातील मताधिक्याचे मोठे महत्त्व असल्याचे मत त्यावेळी राजकीय जाणकारांनी व्यक्त केले होते.
विशेष म्हणजे तेव्हा आमदार किशोर जोरगेवार यांनी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचा उघड प्रचार केला होता, तर 2014च्या निवडणुकीत जोरगेवार यांनी हंसराज अहीर यांचा प्रचार केला होता. तेव्हा हंसराज अहीर यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून 42 हजार 98 मतांचे मताधिक्य घेत काँग्रेसच्या संजय देवतळे यांचा पराभव केला होता. मात्र, या निवडणुकीत आमदार किशोर जोरगेवार हे ‘वेट अॅन्ड वाॅच’च्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे आहे. अद्याप त्यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही.
सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी चंद्रपुरात दाखल झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांचा कॉल मला आला होता. चंद्रशेखर बावनकुळेही त्यांच्यासोबत होते. पण नेमका त्यावेळी मी बाहेर होतो, त्यामुळे ऐन वेळेवर कॉल आल्याने मला सभेला जाणे शक्य झाले नाही. त्यानंतर मात्र भाजपमधून कुणी संपर्क साधला नाही. कोणत्याही निवडणुकीत प्रत्येक पक्षाचे काही नियोजन असते. महायुतीमध्ये जरी असलो, तरी त्यांचे काय नियोजन आहे, हे आम्हाला माहिती नाही. त्यामुळे आम्ही शांत बसलो आहोत आणि ‘वेट ॲंड वॉच’वर आहे, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची भौगोलिक रचना पाहता चंद्रपूर हे केंद्रस्थानी आहे. येथे होणाऱ्या राजकीय हालचालींचा परिणाम संपूर्ण मतदारसंघावर दिसून येतो. लोकसभा निवडणूक मतदारसंघ पाहता उमेदवार प्रत्येक गावापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे ज्याची हवा त्याचा विजय, असेच काहीसे समीकरण असते. त्यामुळे भौगोलिक स्थिती पाहता चंद्रपूर शहराला मोठे महत्त्व आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात काँग्रेस आणि भाजप या दोनही पक्षांचे समान वर्चस्व आहे.
चंद्रपूर मतदारसंघाचा विचार केल्यास हा मतदारसंघ मोठा आहे. सद्यःस्थितीत किशोर जोरगेवार येथील आमदार आहेत. 3 लाख 96 हजार मतदारांचा हा मतदारसंघ आहे. मागील विधानसभा निवडणुकीत 72 हजार 661 मतांच्या फरकाने जोरगेवार यांनी भाजपचे प्रस्थापित आमदार नाना शामकुळे यांचा पराभव केला होता. ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. तेव्हा या मतदारसंघात भाजप नेते तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर या मोठ्या नेत्याशी थेट लढत जोरगेवारांनी ऐतिहासिक विजय मिळविला होता.
जोरगेवारांच्या या विजयाने तब्बल २५ वर्षांनंतर भाजपच्या गडाला खिंडार पडले होते, तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत जोरगेवार यांनी काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे उघडपणे काम केले होते. परिणामी भाजपचा बाल्लेकिल्ला समजला जाणाऱ्या चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी हंसराज अहीर यांना पिछाडीवर टाकले होते. या मतदारसंघात त्यांनी 1 लाख 3 हजार 931 मत मिळवीत 25 हजार 744 मतांची आघाडी घेतली होती. परिणामी त्यांचा 44 हजार 763 मतांनी विजय झाला होता.
2014 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत जोरगेवार यांनी हंसराज अहीर यांचा प्रचार केला. त्यावेळी हंसराज अहीर यांनी चंद्रपूर मतदारसंघात 89 हजार 332 मते घेत येथून 42 हजार 98 मतांची आघाडी घेतली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. त्यामुळे या मतदारसंघात आमदार किशोर जोरगेवार सोबत असणे प्रत्येक उमेदवाराला गरजेचे वाटणे स्वाभाविक आहे. मागील काही वर्षांत त्यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून मतदारसंघात मोठे सामाजिक काम केले आहे. विविध उपक्रम राबवत नागरिकांशी ते थेट जुळले आहेत.
यंग चांदा ब्रिगेडचे सक्रिय कार्यकर्ते प्रत्येक प्रभागात आहेत. 2019 च्या तुलनेत आमदार जोरगेवारांचे बळ वाढल्याचे चित्र आहे. मात्र, या निवडणुकीत त्यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. काँग्रेसच्या उमेदवाराने त्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. आमदार जोरगेवार सध्या ‘वेट ॲंड वॉच’च्या भूमिकेत दिसत आहेत. आमदार जोरगेवार राज्यात महायुतीच्या सरकारसोबत आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि इतरही नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे ते महायुतीचा धर्म निभावतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
Edited By : Atul Mehere
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.