राजेश चरपे
Nagpur Politics: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयारी लागली असून मतदारसंघनिहाय निरीक्षक व समन्वयकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी विधानसभेतील विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली. माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडे वर्धा आणि यवतमाळ तर डॉ. नितीन राऊत यांची चंद्रपूर व गडचिरोली मतदार संघाचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय समन्वयकांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
नागपुरात नितीन गडकरी, रामटेकचे कृपाल तुमाने, भंडाऱ्यात सुनील मेंढे, गडचिरोली अशोक नेते, यवतमाळच्या भावना गवळी, वर्ध्यात रामदास तडस, अमरावती नवनीत राणा, बुलढाण्यात प्रताप जाधव आणि अकोल्यात संजय धोत्रे यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या पराभवासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. विविध विरोधी पक्षाची मोट बांधण्यात आल्यानंतर काँग्रेसने पुढील लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. लोकसभा मतदार संघात काँग्रेसने विदर्भात निरीक्षक व समन्वयकांची नियुक्ती केली आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या मतदार संघात निरीक्षक म्हणून प्रामुख्याने नागपुरातील रहिवासी असलेल्या नेत्यांची नियुक्ती निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.
नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निरीक्षक नियुक्त करण्यात आले. रामटेक मतदार संघात रविंद्र दरेकर यांना तर नागपूर मतदार संघात माजी आमदार वीरेंद्र जगताप, भंडारा गोंदिया मतदार संघात राजा तिडके यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
वर्धा, यवतमाळ-वाशिम मतदार संघात सुनील केदार निरीक्षक असून वर्धा जिया पटेल तर यवतमाळ-वाशिमसाठी संजय राठोड यांना समन्वयक करण्यात आले आहे. गडचिरोली-चिमुर व चंद्रपूर मतदार संघात माजीमंत्री डॉ. नितीन राऊत यांना निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले तर डॉ. नामदेव किरसान यांना गडचिरोलीचे समन्वयक आणि मुजीब पठाण यांना चंद्रपूरचे समन्वयक घोषित करण्यात आले.
आजपासून बैठकांचे सत्र
निरीक्षक व समन्वयक यांनी जिल्हाध्यक्ष, विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची बैठक घेऊन लोकसभा क्षेत्रातील स्थितीचा आढावा घ्यावा, अशी सूचना प्रदेश काँग्रेसने केली आहे. त्यानुसार ७ ऑगस्टपासून या बैठकांना सुरुवात होणार आहे. १४ ऑगस्टपर्यंत या बैठका होणार असून सर्वच मतदार संघातील माजी खासदार, आमदार व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.