Amravati Graduate Constituency Election : अमरावती (Amravati) पदवीधर मतदार संघातून १२ वर्ष आमदार राहिलेले डॉ. रणजीत पाटील यांना भाजपनं आपली उमेदवारी दिली आहे. रणजीत पाटलांसमोर आधीच विखुरलेल्या कॉंग्रेसचा टिकाव लागणार नाही. कारण त्यांना स्वतःचा उमेदवारदेखील सापडलेला नाही, अशी टिका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली.
डॉ. रणजीत पाटील यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या पदवीधर मतदारांच्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, (Chandrashekhar Bawankule) खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, (Navnit Rana) शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार प्रवीण पोटे उपस्थित होते. कॉंग्रेस स्वबळावर सत्तेत येईल, या नाना पटोलेंच्या वक्तव्याचा खासदार राणा यांनी भाषणातून चांगलाच समाचार घेतला.
माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने आज कारवाई केली. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ईडीला कारवाई करण्याचे स्वतंत्र अधिकार आहेत. अधिकाऱ्यांकडे काही पुरावे आले असतील म्हणून त्यांनी ही कारवाई केली आहे. जनतेचे पैसे प्रामाणिकपणे वापरले पाहिजे, नसतील वापरले, भ्रष्टाचार केला असेल, तर नक्कीच कारवाई होणार. त्यांनी काही केले नसेल, तर ते कारवाईने घाबरत का आहेत, असाही सवाल नवनीत राणा यांनी केला.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेबाबत खासदार राणा म्हणाल्या, न तुटलेल्या भारताला जोडायला काँग्रेस निघाली आहे, मात्र जी काँग्रेस तुटली आहे, त्याला आधी जोडा. काँग्रेसकडे अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार नाहीये. तरीही ते स्वबळाची भाषा करीत आहेत. भारत जोडो, हात से हात जोडो, हे सर्व नंतर करावे. आधी त्यांनी आपला पक्ष जोडण्याकडे लक्ष द्यावे, असे म्हणत खासदार राणा यांनी नाना पटोले यांना लक्ष्य केले.
देवेंद्र फडणवीस यांचे काम आमच्या विदर्भातील जनतेला आवडते. फडणवीस आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी फडणवीस विदर्भाला न्याय देणारे आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. विदर्भासाठी त्यांच्यायेवढे काम आजवर कुणी केले नाही, असे म्हणत खासदार राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.